मुख्य बातम्या मोबाईल

"कोरोना'चा शेवटचा रुग्ण बरा होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही ! 

सरकारनामा ब्युरो

नाशिक : "कोरोना'चे उपचार व औषधांची उपलब्धता यावर सगळ्यांनी भर दिला पाहिजे. रेमडिसिव्हर इंडेक्‍शनचा किती साठा आहे, त्याचे फलक रुग्णालयाबाहेर प्रदर्शीत करावेत. कोरोनाचा शेवटचा रुग्ण बरा होईपर्यंत शासन, प्रशासन आणि वैद्यकीय यंत्रणेने स्वस्थ बसता कामा नये. कोरोनाचा पराभव हे आपले ध्येय आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले. 

"कोविड'च्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्‍याची आढावा बैठक श्री. भुजबळ यांच्या प्रमुख झाली. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात झालेल्या या बैठकीस आरोग्य विभागाचे विविध अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, जिल्ह्यात उपलब्ध असलेली "रेमडिसिव्हर'ची इंजेक्‍शन रूग्णांना वेळेत व वाजवी दराने मिळतील याची दक्षता घ्यावी. "रेमडिसिव्हर'चा पुरवठा सुरळीत करण्यात यावा. त्याचा किती साठा उपलब्ध आहे, याबाबत प्रत्येक रुग्णालयाबाहेर बोर्ड लावण्यात यावा. जास्तीत जास्त "रेमडिसिव्हर'चा साठा शासकीय रुग्णालयाच्या औषध विक्री केंद्रामार्फत उपलब्ध करून देण्यात यावे, 

यावेळी ते म्हणाले, रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांमध्ये घट होत आहे. तरीदेखील भविष्यातील संभाव्य वाढ विचारात घेता ऑक्‍सिजन, बेड्‌स आणि औषधांची कमतरता निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी. गर्दीची ठिकाणे, बाजारपेठा तसेच सार्वजनिक ठिकाणी जनजागृती आणि प्रसिद्धीवर भर देण्यात यावा. कोरोनाचा शेवटचा रुग्ण बरा होत नाही, तोपर्यंत शासन, प्रशासनास स्वस्थ बसता येणार नाही. मुंबईतील "केईएम' रुग्णालयाच्या धर्तीवर नाशिकमध्ये सर्व प्रकारच्या रुग्णांसाठी महापलिकेमार्फत अद्यावत रुग्णालय तयार करण्यास प्राधान्य देण्यात यावे. द्रवरूप ऑक्‍सिजनच्या टाक्‍या लवकरात लवकर बसविण्यात यावेत. याविषयी काय कामे झाली याची पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा आढावा बैठक घेण्यात येईल. शहर जिल्ह्यातील मृत्युदर आटोक्‍यात राहण्यासाठी प्रयत्न करावे. येवला उपजिल्हा रुग्णालयात तातडीने सर्व सुविधा व व्यवस्था पूर्ण करण्यात याव्यात. 

श्री भुजबळ म्हणाले, कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगचे प्रमाण सर्वाधिक आहे. ऑक्‍सिजनच्या उपलब्धतेबाबत देखील प्रशासनाने गेल्या पंधरा दिवसात प्रयत्नपूर्वक नवीन क्षमता निर्माण केली आहे. सध्या ऑक्‍सिजनचा तुटवडा भासत नाही. सर्वसामान्य नागरिकांना सहजतेने माहिती उपलब्ध होण्यासाठी औषध उपलब्धते बाबत प्रचार, प्रसार करण्यास प्राधान्य द्यावे. प्रत्येक रुग्णालयाबाहेर बेड्‌स आणि औषध साठ्याबाबत माहिती प्रदर्शीत करावी. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी. मेडिक्‍लेमच्या बाबतीत येणाऱ्या अडचणी राज्यस्तरावर नेण्यात येऊन सोडविण्यात येतील, असेही यावेळी श्री. भुजबळ यांनी सांगितले. 

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार माणिक कोकाटे, आमदार सरोज आहिरे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष डॉ. सयाजी गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य सिमांतीनी कोकाटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांसह अधिकारी उपस्थित होते. 
... 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT