1dvendra_20fadnavis_uddhav_20thackeray.jpg
1dvendra_20fadnavis_uddhav_20thackeray.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

'खुर्चीला चिकटलं की, तुम्ही कोण अन् आम्ही कोण ?... मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

सरकारनामा ब्युरो

मुंबई : "दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी एके दिवशी मुंबईत आलेले असताना त्यांचा निरोप मला आला. त्यांनी भेटायला बोलावले होते. मी आणि आदित्य गेलो. तेव्हा, शिवसेनाप्रमुखांमुळे मी राष्ट्रपती झालो आणि आता माझा कार्यकाळही संपायला आला आहे. ऋण व्यक्त करायला आज शिवसेनाप्रमुख नाहीत. तरीही त्यांच्या मुलाला भेटून ऋण व्यक्त करण्यासाठी मी तुम्हाला आज बोलावले आहे, असे प्रणवदा म्हणाले. इतक्या मोठ्या मनाचे प्रणवदा होते," असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज विधानसभेत शोक प्रस्तावावर बोलताना म्हणाले. "नाही तर एकदा खुर्चीला चिकटले की, तुम्ही कोण अन् आम्ही कोण, असा प्रवृत्तीचे लोक आहेत," असा टोलाही त्यांनी देवेंद्र फडणवीसांचे नाव न घेता लगावला. 

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, "ज्यांनी राज्यावर, समाजावर आणि देशावर छाप उमटवली, त्यांच्यासाठी शोकप्रस्ताव मांडण्यासाठी मी उभा आहे. माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्याबद्दल जेवढं बोलाव तेवढं कमी आहे. आपलं संपूर्ण जीवन त्यांनी देशासाठी समर्पित केले होते. टपाल कर्मचारी, नंतर प्राध्यापक, देशाचे मंत्री आणि त्यानंतर राष्ट्रपती, असा अवाक करणारा त्यांच्या आयुष्याचा प्रवास थक्क करणारा होता. राजकारणात आपण सगळेच आहोत. पण व्यासंग, हजरजबावीपणा त्यांच्यात ओतप्रोत भरलेला होता. सखोल अभ्यास होता. कुणाशीही वैर नव्हते, केवळ भाषणबाजी नाही, तर प्रत्यक्ष काम करण्यावर त्यांचा भर राहात असे. 

त्यांनी संकटांतून सरकारला आणि पक्षाला त्यावेळी त्यांनी वाचवले होते. राजकारणात शत्रू तसेच मित्रही असतात. पण त्यांचे शत्रू कोणत्याही पक्षात नव्हते. राष्ट्रपती पदाची निवडणूक लढताना शिवसेना जुन्या मित्रांसोबत होती. त्यावेळी शिवसेना प्रमुखांनी प्रणवदांना उघड पाठिंबा दिला होता. प्रणवदा शरद पवारांसोबत मातोश्रीला आले होते. तेव्हा माझी त्यांच्यासोबत पहिल्यांदा भेट झाली होती. त्यानंतर राष्ट्रपती भवनात गेलो होतो, तेव्हाही भेटलो. एकंदर तीन वेळा त्यांना मी भेटलो. 

मातोश्रीला आले असताना शिवसेनाप्रमुख आणि प्रणवदा बोलत होते. मी त्यांना बघतच होतो. अतिशय संवेदनशील माणूस आणि आब राखून बोलण्याची त्यांची शैली होती. त्यानंतर राष्ट्रपती भवनात आम्ही एनडीएला मोदींना पाठिंबा दर्शवायला गेलो होतो. तेव्हा त्यांच्याशी बोलणं झालं नव्हतं. 

पण नंतरच्या काळात प्रणवदा मुंबईला आले असताना. एक दिवस त्यांचा निरोप आला. मी त्यांना भेटायला गेलो सोबत आदित्य होता. आम्ही राजभवनात गेलो. महापालिकेच्या निवडणुका नुकत्याच झाल्या होत्या. त्यासाठी त्यांनी माझं अभिनंदन केलं आणि म्हणाले की, माझ्या ध्यानीमनीही नव्हतं पण शिवसेनाप्रमुखांनी जी भूमिका त्यावेळी घेतली त्यामुळेच मी राष्ट्रपती झालो. आज शिवसेनाप्रमुख हयात नाहीत. माझी कारकीर्द संपत आली. आज ऋण व्यक्त करण्यासाठी शिवसेनाप्रमुख नाहीत पण त्यांच्या पुत्राला बोलावून ऋण व्यक्त करावं ही इच्छा होती, त्यामुळे तुम्हाला बोलावून घेतलं, असे त्यांनी सांगितल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 

त्या पिढीतले एक एक तारे निखळायला लागले आहेत. प्रणवदांच्या जाण्याने एक पर्व अस्ताला गेले आहे. सभागृहाच्या वतीने श्रद्धांजली वाहतो, असे म्हटल्यावर लगेच 'खुर्चीला चिकटलं का, तुम्ही कोण अन् आम्ही कोण?’, अशाही प्रवृत्तीची लोकं असतात, असा टोला मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांचं नाव न घेता हाणला.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT