China allows couples to have three children
China allows couples to have three children 
मुख्य बातम्या मोबाईल

लोकसंख्या वाढवण्यासाठी जोडप्याला तीन मुलं जन्माला घालण्याची परवानगी

वृत्तसंस्था

बीजिंग : जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनने आपल्या धोरणांमध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी चीने सहा वर्षांपूर्वी एका जोडप्याला केवळ दोन मुलं जन्माला घालता येतील, असे बंधन घातले होते. या धोरणात आता बदल करण्यात आला आहे. लोकसंख्येमध्ये मोठी घट झाल्याने चिंता व्यक्त करत चीने आता एका जोडप्याला तीन मुलांच्या जन्माला परवानगी दिली आहे. (China allows couples to have three children)

मे महिन्याच्या सुरूवातीला चीनमधील लोकसंख्येबाबतचा महत्वाचा अहवाल समोर आला होता. त्यानुसार 1960 नंतर यावर्षी पहिल्यांदाच लोकसंख्या वाढीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. चीनमध्ये पूर्वी केवळ एकच मुल जन्माला घालण्याचे 'वन चाईल्ड पॅालिसी' धोरण होते. त्यात 2015 मध्ये बदल करून दोन मुलांना परवानगी देण्यात आली. आता लोकसंख्या वाढीसाठी हे धोरणही बदलण्यात आले आहे. 

मागील दहा वर्षांत चीनच्या लोकसंख्येत 5.38 टक्क्यांनी वाढ होत ती सुमारे 141 कोटींवर पोहचली आहे. लोकसंख्येतील वार्षिक वाढ 0.3 टक्क्यांनी कमी झाली आहे. 2000 ते 2010 मध्ये ही वार्षिक वाढ 0.57 टक्के एवढी होती. जवळपास चार दशके चीनने वादग्रस्त ठरलेल्या एका मुलाचे धोरण राबवले. पण मागील काही वर्षांत या धोरणांमुळे चीनमधील मुलं जन्माला येण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी झाले. त्यामुळं मग दोन मुलांना परवानगी देण्यात आली होती. 

चीनने जाहीर केलेल्या नवीन धोरणावर तेथील अनेकांनी विरोध केला आहे. चीनमधील सोशल मीडियात त्यावर टीका होत आहे. चीनमध्ये मुलं सांभाळण्याचा खर्च परवडत नाही. आम्ही एक किंवा दोन मुलंही नीट सांभाळू शकत नाही, असे काहींनी म्हटलं आहे. मला 50 लाख रुपये दिले तर मी तीन मुलं जन्माला घालू शकतो, अशी पोस्ट एकाने केली आहे. 

गेल्यावर्षी चीनमध्ये एक कोटी वीस लाख बाळांचा जन्म झाला होता. 2016 मध्ये हा आकडा एक कोटी 80 लाख एवढा होता. चीनमधील लोकसंख्या वाढीचा दर असाच घटत राहिला तर त्याचा नकारात्मक परिणाम होईल, असा दावा काही तज्ज्ञांनी केला आहे. देशातील लोकसंख्या वाढली तरी त्यात तरूणांच्या संख्येच्या तुलनेत वृध्दांची संख्या अधिक असेल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT