Udddhav Thackeray - Parambir Singh- Sharad Pawar
Udddhav Thackeray - Parambir Singh- Sharad Pawar 
मुख्य बातम्या मोबाईल

परमबीरसिंग बदली; शरद पवारांनी दिलेला सल्ला उद्धव ठाकरे मानणार का?

मृणालिनी नानिवडेकर

मुंबई :  सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलिसांनी केलेल्या आगळिकीची जबाबदारी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांच्यापर्यंत जाईल, या शंकेमुळे त्यांना पदमुक्त करण्याचा सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला असल्याचे बोलले जात असतानाच त्यांना दूर करण्याची गरज नसल्याचे मध्यरात्री संपलेल्या बैठकीत निश्चित झाले.

परमबीर यांचा वाझे प्रकरणात कोणताही संबंध नाही, केंद्राने राज्य सरकारला अडचणीत आणण्यासाठी हे प्रकरण सुरु केले असावे, अशी भूमिका शिवसेनेने घेतल्याचे सांगितले जाते. आज ता १७ रोजी सकाळी १० वाजता महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे.

मराठी अधिकारी हवा

परमबीरसिंग यांना केले तर त्या जागी भ्रष्टाचाराचे कोणताही आरोप नसलेला अधिकारी नेमण्यास  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सर्वाधिक प्राधान्य असेल असे समजते. आघाडी सरकारमध्ये गृहखाते राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असल्याने परमबीर यांच्या नावाचा आग्रह उद्धव ठाकरे यांना स्वीकारावा लागला होता. त्यांना पायउतार केल्यास येणारे नवे आयुक्त प्रामाणिक सचोटीचे असावे असा ठाकरे यांचा विचार असल्याचे एका ज्येष्ठ मंत्र्याने सांगितले. रजनीश सेठ हे कोणत्याही वादात नसलेले ज्येष्ठ अधिकारी आहेत. मात्र ते कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जवळचे असल्याचे सांगितले जाते. 

मुंबई महापालिकेच्या निवडणुका लवकरच होणार असल्याने आयुकंतपदावरील व्यक्ती शिवसेनेसाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेनुसार  मराठी माणसाला या पदावर नेमणे फायद्याचे ठरेल असे मानले जाते. विवेक फणसळकर, सदानंद दाते आणि अतुलचंद्र कुळकर्णी या तीन अधिकाऱ्यांची नावे शिवसेनेच्या मनात असल्याचे विश्वसनीयरित्या समजते. 

फणसळकर सध्या ठाण्याचे आयुक्त आहेत तर २६ नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या हल्ल्यात अतुलनीय धैर्य दाखवणारे दाते नव्याने तयार झालेल्या मीराभाइंदरचे आयुक्त आहेत. राज्य सीआयडीचे प्रमुख असलेल्या अतुलचंद्र कुळकर्णी यांचे उद्धव ठाकरे यांनी फेसबुकलाईव्हवर जाहीर कौतुक केले होते. नरेंद्र दाभोळकर हत्येचा तसेच पालघरमधील साधूहत्यांचा केलेला तपास या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.

बदल नाहीच?

दरम्यान महाविकास आघाडीतील सहकाऱ्यांनी आग्रह धरला असला तरी परमबीर यांची बदली होण्याची शक्यता नाही, असे त्यांचे निकटवर्तीय सांगत आहेत. वाझे प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने परमबीर यांना चौकशीला बोलावले तर तो मात्र मुंबई पोलिस दलावर डाग ठरेल. तसे होणे टाळण्यासाठी बदली करावी लागेल, असेही मंत्रालयातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT