congress leader held over antinational and objectioable post on social media
congress leader held over antinational and objectioable post on social media  
मुख्य बातम्या मोबाईल

सोशल मीडियावर सरकारविरोधी बोलणे भोवले; काँगेस नेत्याला देशद्रोहप्रकरणी अटक

वृत्तसंस्था

शिमला : सोशल मीडियावर देशद्रोही आणि आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याच्या आरोपावरुन काँग्रेस नेते व माजी आमदार नीरज भारती यांना हिमाचल पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. राज्यातील भाजपचे सरकार विरोधी पक्षातील नेत्यांना लक्ष्य करीत आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीरज भारती हे जवाली मतदारसंघातील माजी आमदार आहेत. ते मागील काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात मुख्य संसदीय सचिव होते. त्यांनी सोशल मीडियावर देशविरोधी आणि आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या होत्या. या प्रकरणी शिमल्यातील वकील नरेंद्र गुलेरिया यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी भारती यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. भारती यांनी अवमानजनक आणि प्रक्षोभक भाषेचा वापर केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. 

भारती यांनी फेसबुकवर अनेक पोस्ट टाकल्या आहेत. भारत आणि चीनच्या सैन्यात गल्वान खोऱ्यात झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्र सरकारवर टीका करणाऱ्या पोस्ट टाकल्या आहेत. यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्याही पोस्ट टाकल्या आहेत. भारत आणि चीनच्या सैन्यात गल्वान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये जुंपली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या प्रकरणी पंतप्रधान मोदींवर थेट निशाणा साधला आहे. त्यानंतर भाजप नेत्यांकडून राहुल गांधी यांना लक्ष्य केले जात आहे. 

भारत आणि चीनमध्ये सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी मागील महिन्यापासून चर्चा सुरू आहे. मात्र, 15 जूनला भारत आणि चीनच्या सैन्यात गल्वान खोऱ्यात झालेल्या संघर्षात 20 भारतीय जवान हुतात्मा झाले होते. यात चीनचेही काही सैनिक ठार झाल्याचा दावा भारतीय लष्कराने केला आहे. मात्र, नेमकी संख्या लष्कराने जाहीर केलेली नाही. चीनच्या सैन्यानेही त्यांच्या ठार झालेल्या जवानांचा आकडा सांगितलेला नाही. 'एएनआय' वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, चीनचे 43 सैनिक ठार झाले आहेत. तसेच, अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या अहवालात चीनचे सुमारे 35 सैनिक मारले गेल्याचे म्हटले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT