congress legislative party meet unanimously supports the government led by ashok gehlot
congress legislative party meet unanimously supports the government led by ashok gehlot 
मुख्य बातम्या मोबाईल

सत्तापेचात गेहलोतच फ्रंटसीटवर; पायलट यांना पुन्हा फेकले मागील सीटवर

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांच्यातील वाद उफाळून आला आहे. काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या आजच्या बैठकीलाही पायलट हे अपेक्षेप्रमाणे अनुपस्थित राहिले. या बैठकीत काँग्रेस सरकार आणि पक्षाच्या विरोधात कारवाया करणाऱ्या नेत्यांवर कठोर कारवाईचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. यामुळे अखेर पायलट यांचे बंड पेल्यातील वादळच ठरले आहे. अद्याप पायलट यांनी यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला आज सुमारे 90 आमदार हजर होते. ही बैठक गेहलोत यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीतून बाहेर पडताना पक्षाचे आमदार विजयाची खूण करीत होते. त्यामुळे गेहलोत यांनी शक्तिप्रदर्शन करुन पक्षश्रेष्ठींवर दबाव आणल्याचे चित्र आहे. या वेळी पक्षाने पाठविलेले केंद्रीय निरीक्षक रणदीप सुरजेवाला आणि अजय माकन हेही उपस्थित होते. 

या बैठकीत काही ठराव मंजूर करण्यात आले. यामध्ये राज्यातील लोकशाहीला धक्का पोचवून भाजप आठ कोटी जनतेचा अपमान करीत आहे. हे कदापी स्वीकारार्ह नाही. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी यांनी घेतलेले निर्णय आम्हाला मान्य असतील. राज्यातील अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकार एकमताने पाठिंबा आहे.  राज्यातील काँग्रेसचे सरकार आणि पक्षाच्या विरोधात कारवाया करणारे पक्ष पदाधिकारी अथवा आमदार यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.

सचिन पायलट यांच्याशी पक्षाकडून चर्चा सुरू आहे. मागील 48 तासांत अनेक वेळा त्यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. राज्यातील मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थिर असून, ते पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असे सुरजेवाला यांनी सांगितले. 
उपमुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट हे काही आमदारांसह दिल्लीत पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी गेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राजस्थान काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. गेहलोत यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक आज बोलाविली होती. या बैठकीला सरकारला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांनाही पाचारण करण्यात आले होते. 

पायलट यांनी उघडपणे संघर्षाची भूमिका घेतल्याने राज्य पातळीवर सर्व सूत्रे गेहलोत यांनी स्वत:च्या हाती घेतली आहेत. याचाच भाग म्हणून आमदारांची बैठक बोलाविण्यात आली होती. अनेक मंत्री आणि आमदारांनी गेहलोत यांना दूरध्वनी करुन पाठिंबा दर्शविला आहे. या बैठकीला अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस व राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे उपस्थित होते. 

दरम्यान, काल रात्री सचिन पायलट यांनी 30 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. राजस्थानमधील मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार अल्पमतात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे. याचबरोबर आज होणाऱ्या काँग्रेसच्या विधिमंडळ बैठकीलाही पायलट उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. 

Edited by Sanjay Jadhav    

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT