Congress Meeting held in Mumbai for Local Bodies Elections
Congress Meeting held in Mumbai for Local Bodies Elections 
मुख्य बातम्या मोबाईल

तुम्ही सरकारची कामे पोहोचवा, निवडणुकीसाठी आम्ही मदत करू....

सरकारनामा ब्युरो

मुंबई : सध्याचे वातावरण महाविकास आघाडीला अनुकूल असून कार्यकर्त्यांनी सरकारची लोकोपयोगी कामे लोकांपर्यंत पोहोचवावीत, आम्ही सरकार व पक्ष म्हणून तुम्हाला सर्व ती ताकद देऊ, असे आश्वासन राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री तथा नवी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी कार्यकर्त्यांना दिले. 

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी आढावा बैठक घेतली. महाविकास आघाडी सरकारने एका वर्षातच लोकोपयोगी कामांचा धडाका लावला असून सरकारच्या योजना व केलेली कामे लोकांपर्यंत पोहचवा. महाविकास आघाडी सरकारने मच्छिमारांसाठी पॅकेज दिले आहे, २०० कोटी रुपये डिझेलची थकबाकी होती त्यातील ९० कोटी रुपये मंजूर केले आहेत. मच्छिमारांसाठी यापूर्वीही काँग्रेसचे सरकार असतानाच पॅकेज दिले गेले आहे आणि आताही पॅकेज दिले आहे. एका वर्षात केलेली कामे लोकापर्यंत पोहचवा असे आवाहन शेख यांनी यावेळी केले. 

मुंबईतील गांधी भवन येथे नवी मुंबई महापालिका निवडणकीसंदर्भात संपर्क मंत्री अस्लम शेख यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन, सरचिटणीस मोहन जोशी, प्रदेश काँग्रेसचे सचिव रामचंद्र आबा दळवी, नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रदेश काँग्रेसचे प्रभारी राहुल दिवे, शितल म्हात्रे, प्रदेश काँग्रेस प्रवक्त्या निला लिमये, नवी मुंबई काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, अंकुश सोनावणे, सुधीर पवार, ब्लॉक अध्यक्ष यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना अस्लम शेख म्हणाले की, सध्याचे वातावरण महाविकास आघाडीसाठी अनुकुल असून एका वर्षांत लोकोपयोगी कामे केलेली आहेत. वार्डा-वार्डात जाऊन सरकारची कामे पोहचवा. कार्यकर्त्यांनी कामाची विभागणी करुन जबाबदारी वाटून घ्यावी, ताकदीने कामाला लागा. सरकार व पक्ष म्हणून आम्ही तुम्हाला सर्व ती ताकद देऊ, असा विश्वास अस्लम शेख यांनी दिला.

राज्य सरकारने महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत. महसूल विभागाने स्टॅम्प ड्युटी कमी केल्याने घर खरेदीसाठी मध्यमवर्ग तसेच सामान्य लोकांना चांगला फायदा झालेला आहे. स्थानिक कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावे. पक्ष आपल्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे, असे प्रदेश कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन म्हणाले.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT