Congress-Shiv Sena will fight for Motala Nagar Panchayat
Congress-Shiv Sena will fight for Motala Nagar Panchayat  
मुख्य बातम्या मोबाईल

महाविकास आघाडीतील कॉंग्रेस-शिवसेनेत मोताळ्यात रंगणार कुस्ती 

शाहीद कुरेशी

मोताळा (जि. बुलडाणा) : मोताळे नगरपंचायतीची निवडणूक उंबरठ्यावर आली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारे जोमात वाहत असून, काही लोकप्रतिनिधींसह कार्यकर्ते एका पक्षाला रामराम ठोकून दुसऱ्या पक्षात कोलांटउड्या मारत आहेत. विशेष म्हणजे, अनेकांच्या भाऊबंदकीतील लोकांनी वेगवेगळ्या पक्षात प्रवेश घेतल्याने पक्षांतराचे राजकारण भाऊबंदकीवर भारी पडल्याचे दिसत आहे. 

मागील पाच वर्षांपासून येथील नगरपंचायतीवर कॉंग्रेसची सत्ता आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये नगरपंचायतीचा कार्यकाळ संपत आहे. दरम्यान, मोताळा नगरपंचायतीचा गढ कायम राखण्यासाठी माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात कॉंग्रेस जोमाने भिडण्याची तयारी करत आहे. बुलडाणा विधानसभा मतदारसंघा प्रमाणेच मोताळा नगर पंचायतीवर भगवा फडकवण्यासाठी विद्यमान आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात शिवसेना ही निवडणुकीचा रणसंग्राम गाजविण्याच्या तयारीत आहे. 

या पार्श्वभूमीवर मोताळा शहरात राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, पक्षांतराला वेग आला आहे. काही लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते पक्षनिष्ठा बाजूला ठेवून दुसऱ्या पक्षात कोलांट उड्या मारीत आहेत. अर्थात, या पक्षांतराच्या पाठीमागे वेगवेगळी कारणे आहेत. मात्र या राजकीय घडामोडी चर्चेच्या ठरत आहेत. 

पक्ष प्रवेशाच्या या राजकारणात शिवसेना व कॉंग्रेसमध्ये कमालीची चुरस दिसत आहे. त्यांच्या पाठोपाठ भाजपमध्ये सुद्धा इनकमिंग सुरू झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस सध्या संयमाच्या भूमिकेत दिसत आहे. एकंदरीत मोताळा नगर पंचायतीची निवडणूक चुरशीची होणार आहे. 

पक्षांतराच्या राजकीय घडामोडीत अनेकांची भाऊबंदकी वेगवेगळ्या पक्षात दिसत आहेत. एकाच कुटुंबात वेगवेगळे झेंडे दिसत असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, निवडणुकीच्या रणसंग्रामात पक्षनिष्ठा जोपासल्या जाईल की नातेसंबंध, हे निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे. 

सर्वसामान्यांना विकासाची अपेक्षा 

मागील पाच वर्षांच्या काळात मोताळा शहरात बरीच विकासकामे झाली असली तरी अनेक समस्या सुद्धा कायम आहेत. आता नगर पंचायतीची निवडणूक जवळ आली आहे. या पार्श्वभूमीवर अनेकांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मात्र, सर्वसामान्यांना राजकारणाच्या चर्चांमध्ये रस नसून, शहराच्या विकासाची अपेक्षा आहे. 


हेही वाचा : डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधान परिषदेच्या उपसभापतिपदी निवड 


मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापतिपदी शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची आवाजी मताने मंगळवारी (ता. 8 सप्टेंबर) निवड करण्यात आली. भारतीय जनता पक्षाने उपसभापती निवडीला उच्च न्यायालयात आव्हान दिल्याने पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. त्यानंतर गोऱ्हे यांची एकमताने निवड करण्यात आली. 

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर भरविण्यात आलेल्या दोन दिवसांच्या अधिवेशनात काही आमदार अनुउपस्थित आहेत. कोरोनाग्रस्त आमदारांना मतदानासाठी मुंबईत पोचणे शक्‍य नाही, त्यामुळे विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक घेणे अयोग्य आहे, अशी भूमिका भाजपची घेतली आहे. 

विधान परिषदेच्या सदस्यांना मूलभूत मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवले जात आहे, असा आरोप करत भाजपचे प्रतोद सूरजितसिंह ठाकूर यांनी याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याची सुनावणी उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. 10 सप्टेंबर) ठेवली आहे. त्यामुळे निवडणुकीची एवढी घाई का? उच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी आहे; तोपर्यंत निवडणूक घेऊ नये, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT