sanjay raut jpg
sanjay raut jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चांवर राऊत यांचे महत्वाचे विधान...

सरकारनामा ब्युरो

मुंबई : बाळासाहेब थोरात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राज्यात रंगली आहे. थोरात यांच्या जागी दुसऱ्या नेत्याला प्रदेशाध्यक्षपद दिलं जाणार असल्याचं बोललं जात आहे.

थोरात यांनी सोमवारी दिल्लीत जाऊन ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी घेत नाराजी जाहीर केल्याची चर्चा होती. बाळासाहेब थोरात यांनी या बातम्या चुकीच्या असल्याचे म्हटले होते. या सर्व घडामोडींवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपले मत मांडले आहे. 

विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडे आहे. विदर्भातील नाना पटोले तिथे अध्यक्ष आहेत. मी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून पाहतोय की, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बदलले जात आहेत. जी काही नावं आहेत, त्यात नाना पटोलेंचं नाव आहे.

आता हा शेवटी त्यांचा अंतर्गत प्रश्न असला तरी महाविकास आघाडीमध्ये असणाऱ्या एका प्रमुख पक्षातील या घडामोडी आहेत. त्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कारण आमच्यातील कोणताही पक्ष अंतर्गतसुद्धा अस्थिर होऊ नये, अस्वस्थता राहू नये ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. तरच हे तीन पक्षांचं सरकार हे प्रदीर्घ काळ चालणार असल्याचे राऊत म्हणाले. 

बाळासाहेब थोरात यांची भूमिका काय?

“मी दिल्लीत गेलो त्याचा आणि राजीनाम्याचा काही संबंध नाही. माझे दर महिन्याला काही विषय असतात त्यांची चर्चा करण्यासाठी गेलो होतो. मलाही दिल्लीतच ही बातमी समजली,” असं ते म्हणाले. “माझ्याकडे प्रदेशाध्यक्ष, विधीमंडळ नेता आणि महसूल मंत्री या जबाबदाऱ्या असून दिल्लीत जाऊन योग्य प्रकारे त्या सांभाळेन असं सांगितलं होतं. पण तुम्हाला अजून काही जबाबदारी द्यायची असेल तर माझी हरकत नाही असंही सांगितलं होतं.

ऑक्टोबर महिन्यातदेखील मी कोणत्या जबाबदारीचं विभाजन करायचं असेल तर हरकत नाही असं स्पष्ट केलं होतं. एच के पाटील काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी झाल्यानंतर त्यांनासुद्धा ही वस्तुस्थिती सांगितली होती. पण अचानक हा मुद्दा का आला याची मला कल्पना नाही. पण जर ती प्रक्रिया सुरु झाली असेल त्याचं स्वागत करतो,” असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं होतं. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT