Corona infection also affects the family of Pune Mayor Mohol
Corona infection also affects the family of Pune Mayor Mohol  
मुख्य बातम्या मोबाईल

पुण्याचे महापौर मोहोळ यांच्या कुटुंबीयांनाही कोरोनाची लागण 

सरकारनामा ब्यूरो

 पुणे : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या कुटुंबातील आठ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे रविवारी (ता. 5 जुलै) स्पष्ट झाले. या आठ जणांना लागण झाली असली तरी कुणालाही लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर घरातच उपचार करण्यात येणार आहेत. गरज पडली तरच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले. 

महापौर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाल्याचे शनिवारी स्पष्ट झाल्यानंतर त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लगेचच त्यांच्या कुटुंबियांची टेस्ट करण्यात आली. या टेस्टचा रिपोर्ट रविवारी सायंकाळी आला. मोहोळ यांचे आई-वडील, भाऊ, भावजय, पत्नी, छोटी मुलगी, बहीण आणि भाची अशा आठ जणांचा त्यात समावेश आहे. या सर्वांना कोणताही त्रास होत नाही. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून या सर्वांवर घरातच उपचार करण्यात येणार आहेत. 

महापौर मोहोळ हे गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनाचा मुकाबला करताना प्रशासनाबरोबर आहेत. आढावा बैठका, रुग्णालयांची पाहणी, लोकांच्या भेटी असा सलग तीन महिने त्यांचा दिनक्रम सुरू होता. त्यांना लागण झाल्याने कुटुंबीयांनाही लागण झाली असावी, असे सांगण्यात येत आहे.

मोहोळ कुटुंबीय कोथरुड येथे राहात आहे. एकाच इमारतीत वेगवेगळ्या फ्लॅटमध्ये राहात असल्याने विलगीकरणाच्या दृष्टीने सोयीचे आहे. त्यामुळे त्यांना घरातच ठेवण्यात येणार आहे. गरज पडली तरच रुग्णालयात दाखल करण्यात येईल, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले. 

महापौर मुरलधीर मोहोळ कोरोना पॉझिटिव्ह! 

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खुद्द मोहोळ यांनी ट्विटरवरून याची माहिती दिली असून आपली तब्येत उत्तम व स्थिर असल्याचा निर्वाळा दिला आहे. यातून लवकरच बरे होऊन पुणेकरांच्या सेवेसाठी हजर होईन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 

मोहोळ हे गेले काही दिवस सातत्याने कोरोनाच्या स्थितीचा मुकाबला आघाडीवर राहून करत होते. अनेक बैठका, रुग्णालयांना भेटी, दौरे यात ते व्यस्त होते. त्यांच्या कामाचे कौतुक उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनीही केले.

महापौरांनाच लागण झाल्याने पुण्याची यंत्रणा पुन्हा आता अलर्टवर आली आहे. मोहोळ यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांनाही क्वारंटाईन करण्यात येणार आहे. मोहोळ हे अनेक नेत्यांच्या, अधिकाऱ्यांना बैठकांना उपस्थित राहत असल्याने त्यांनाही काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT