Covid19
Covid19 
मुख्य बातम्या मोबाईल

कोरोना चाचण्यांचे रॅकेट? काल पॉझिटिव्ह आज निगेटिव्ह

सरकारनामा ब्युरो

नाशिक : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सर्वच नागरिक बेजार झाले असताना, तपासण्या करणाऱ्या लॅबपासून ते रुग्णालयांच्या चुकांमुळे समस्या अधिकच वाढत आहेत. असाच एक प्रकार लॅबच्या चुकीमुळे समोर आला आहे. एका ७५ वर्षीय महिलेचा पहिल्या दिवशी पॉझिटिव्ह आलेला अहवाल दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह आला. मात्र, दोन दिवस कोरोना रुग्णांमध्ये दाखल केल्याने त्या रुग्णास कोरोना झाल्यास जबाबदार कोण, असा सवाल नातेवाइकांकडून केला जात आहे. 

शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग वाढला असून, भीतीमुळे नागरिक रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट किंवा आरटीपीसीआर चाचणी करून घेत आहेत. मात्र, लॅबकडून प्राप्त होणाऱ्या अहवालामुळे गोंधळ अधिकच वाढत आहे. चेतनानगरमधील ७५ वर्षीय वृद्धेला अर्धांगवायूचा झटका आल्याने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासणी केल्यानंतर मोठ्या रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला त्या महिलेच्या मुलाला देण्यात आला. शनिवारी (ता. २७) मुलगा त्या महिलेला अपोलो रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन आला. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी अपोलो रुग्णालयाशी संबंधित सुप्रीम लॅबमध्ये कोरोना चाचणी करण्यात आली. २८ मार्चला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने महिलेला उपचारासाठी कोविड कक्षात दाखल करण्यात आले. लक्षणे नसल्याने महिलेच्या मुलाने त्याच लॅबमध्ये दुसरी चाचणी करण्याचा निर्णय घेतला. तेथे नमुना दिल्यानंतर २९ मार्चला अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतरही संबंधित वृद्ध महिलेला २४ तास कोविड कक्षातच ठेवण्यात आले. त्यामुळे महिला कोरोनाबाधित आढळून आल्यास जबाबदारी कोणाची, असा सवाल नातेवाइकांनी केला आहे. 

चौकशीची मागणी
अवघ्या २४ तासांत एकाच रुग्णाचा पहिला पॉझिटिव्ह, तर दुसरा निगेटिव्ह अहवाल येतो, ही बाब प्राणघातक आहे. निगेटिव्ह अहवाल प्राप्त होऊनही कोविड कक्षातच ठेवले जाते या संदर्भात वैद्यकीय विभागाने सखोल चौकशी करावी. 
- हेमंत अहिरे, बाधित महिलेचा मुलगा  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT