Criticism of Pawar on things that make Balasaheb proud
Criticism of Pawar on things that make Balasaheb proud  
मुख्य बातम्या मोबाईल

बाळासाहेबांना अभिमान वाटणाऱ्या गोष्टींवर पवारांची टीका : रिमोटवरून भातखळकरांनी शिवसेनेला डिवचले 

सरकारनामा ब्यूरो

पुणे : खासदार संजय राऊत यांनी मुलाखतीत शरद पवारांना "या सरकारचे तुम्ही हेडमास्तर आहात की रिमोट कंट्रोल', असा प्रश्‍न विचारला आहे. त्यावर पवार यांनी दिलेल्या उत्तरावर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी टीका करत शिवसेनेच्या धोरणावर बोट ठेवले आहे. 

राऊत यांच्या त्या प्रश्‍नावर उत्तर देताना पवार म्हणाले की, "मी हेडमास्तर आणि रिमोट कंट्रोलही नाही. हेडमास्तर असला तरी तो शाळेत हवा. लोकशाहीत सरकार किंवा प्रशासन हे रिमोट कंट्रोलने कधी चालत नाही. रिमोट चालतो कुठं? जिथं लोकशाही नाही तिथं. पण आपल्याकडे लोकशाही सरकार आहे आणि लोकशाहीचे सरकार रिमोट कंट्रोलवर कधी चालूच शकत नाही. मला ते मान्य नाही.' 

त्यावर ट्विटद्वारे टीका करताना भातखळकर यांनी शिवसेनेच्या धोरणावर बोट ठेवले आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, रिमोटने सरकार चालवित असल्याबद्दल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिमान होता. त्या रिमोटवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली आहे. म्हणे, लोकशाहीत रिमोटला स्थान नाही. सामनातून थेट बाळासाहेबांवर टीका होईल, याचा कोणी स्वप्नात तरी विचार केला होता का? सामना हे नेमके कुणाचे मुखपत्र आहे, असा सवाल भातखळकर यांनी विचारला आहे. 

भातखळकर ट्विटमध्ये पुढे म्हणतात की, शिवसेना प्रमुखांनी जे अभिमानाने मिरवलं, ते पायदळी तुडवायचे हे सध्या शिवसेनेचे धोरण दिसत आहे. रिमोट कंट्रोलवर शरद पवारांनी सामनातून केलेली टीका, हा त्याचाच भाग आहे. माझा रिमोट बिघाडलेला नाही. टीव्ही बंद पडला आहे, असे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशींबाबत म्हणाले होते. आज ते असते, तर हेच बोलले असते, असा दावाही भातखळकर यांनी केला आहे. 

संजय राऊत ठाकरे ब्रॅंड संपवताहेत 

पुणे : खासदार संजय राऊत यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची घेतलेली बहुचर्चित मॅरेथॉन मुलाखत आज (ता. 11 जुलै) प्रसिद्ध झाली आहे. त्यावर भारतीय जनता पक्षाचे आमदार नीतेश राणे यांनी ट्‌विट करून जोरदार हल्लाबोल केला. सामनाचे संपादक संजय राऊत हे ठाकरे ब्रॅंड संपवायला निघाले आहेत, असा टोला त्यांनी ट्‌विटद्वारे लगावला आहे. 

ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, "सामना'मध्ये छापून येणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या मॅरेथॉन मुलाखती आम्हाला बालपणापासूनच माहित होत्या. त्यांच्या त्या मुलाखती अगदी मेजवानीसारख्या असायच्या. हे त्यांचे अनुयायी तसेच राजकीय विरोधकसुद्धा मान्य करायचे! अगदी शरद पवारसाहेबांना सुद्धा विश्‍वास होता की, ठाकरे ब्रॅंड हा गर्दी खेचणारा होता! आता तोच ठाकरे ब्रॅंड त्यांनी नेमलेले सामनाचे संपादक संपवत आहेत, अशा शब्दांत आमदार नीतेश राणे यांनी संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या घेतलेल्या मुलाखतीवर टीका केली आहे. 

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT