मुख्य बातम्या मोबाईल

पीककर्जासाठी अडवणूक करणाऱ्या बॅंकांवर कारवाई करा : अशोक चव्हाण 

सरकारनामा ब्युरो

मुंबई : खरीपासाठी पीक कर्ज देताना बॅंकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे.  ऐन खरीप हंगाम सुरू असताना शेतकऱ्यांची अशी अडवणूक करणाऱ्या मुजोर बॅंकांवर सरकारने कठोर कारवाई करावी आणि त्यांना सुलभ पद्धतीने पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. 

पीककर्जाच्या वितरणासाठी बॅंका आडमुठी भूमिका घेत असल्याच्या राज्यभरातील शेतकऱ्यांच्या तक्रारी असल्याने यासंदर्भात प्रतिक्रिया देताना चव्हाण म्हणाले की, खरिप हंगामाच्या पेरणीसाठी शेतकरी तयारी करीत आहेत. बी-बियाणे, खतांच्या खरेदीसाठी पैशांची गरज असल्याने ते बॅंकांचे उंबरठे झिजवत आहेत.

पण बॅंकांकडून आवश्‍यकता नसताना आठ-दहा बॅंकांकडून नाहरकत प्रमाणपत्र आणण्यास सांगितले जात आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना वणवण करावी लागते आहे. दुष्काळाच्या संकटातून बाहेर पडून शेतकरी खरीपाकडे आशा लावून बसलेल्या शेतकऱ्यांची अडवणूक करून बॅंकाच त्यांना सावकारांच्या दारात जाण्यास बाध्य करीत असल्याचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सांगितले. 

यंदाच्या खरीप हंगामासाठी 43 हजार 844 कोटी रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. पण बॅंकांच्या उदासिनतेमुळे आतापर्यंत 25 टक्केही कर्जवाटप झालेले नाही. तर दुसरीकडे कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना नव्याने कर्ज देण्यासही काही बॅंका टाळाटाळ करत असल्यानेही शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत.

बॅंकांनी संवेदनशीलता दाखवत शेतकऱ्यांना पतपुरवठा करावा. पीक कर्ज वाटपासाठी शेतकऱ्यांना नाहक त्रास देणाऱ्या व त्यांची अडवणूक करणाऱ्या बॅंकांवर व संबंधित बॅंक अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची आवश्‍यकता असल्याचे चव्हाण म्हणाले. 

राज्य सरकारकडून अशा मुजोर बॅंकांना इशारे देण्यापलिकडे काहीही ठोस कारवाई झाल्याचे दिसत नाही. किमान आतातरी सरकारने पीककर्ज वाटपात कुचराई करणाऱ्या आणि शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची इच्छाशक्ती दाखवावी, असेही त्यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT