Crowd of Pandharpur residents again in front of Paricharak Wada
Crowd of Pandharpur residents again in front of Paricharak Wada 
मुख्य बातम्या मोबाईल

परिचारक वाड्यासमोर पंढरपूरवासियांची पुन्हा गर्दी

भारत नागणे

पंढरपूर, ता. 11 : सोलापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह कुटुंबातील 11 सदस्यांना ऑगस्ट महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. पुण्यात उपचारादरम्यान माजी आमदार सुधाकर परिचारक यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या निधनाने परिचारक कुटुंबावर मोठा आघात झाला.

प्रशांत परिचारक, युटोपियन शुगरचे अध्यक्ष उमेश परिचारक यांसह सदस्य काही दिवस क्वारंटाइन होते. मात्र, कोरोनामुक्त झाल्यानंतर स्वतःचे दुःख बाजूला ठेवून आमदार परिचारकांसह त्यांचे बंधू उमेश हेही पुन्हा जनसेवेत दाखल झाले आहेत. 

आमदार परिचारक यांनी आज (ता. 11 सप्टेंबर) आपल्या वाड्यावर कार्यकर्त्यांशी संवाद साधला. काका सुधाकरपंत परिचारक यांच्या आठवणींनी पुतणे प्रशांत परिचारक भावूक झाले होते. मात्र, वेळीच स्वतःला सावरत यांनी कार्यकर्त्यांना धीर दिला. अनेकांचे प्रश्‍न मार्गी लावण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. 

सुधाकर परिचारक यांचा जिल्ह्यातील अनेक सहकारी साखर कारखाने, बॅंका, पतसंस्था, दूध संघ, विविध कार्यकारी सेवा सोसाट्यांसह स्थानिक स्वराज्य संस्थांशी निकटचा संबंध होता. त्यांच्या निधनाने जिल्ह्यातील सहकार क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

सुधाकर परिचारक यांच्या निधनानंतर त्यांचे पुतणे आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर राजकीय जबाबदारी येऊन पडली आहे. आमदार परिचारक यांनी आपले दुःख बाजूला ठेवून सर्वसामान्य शेतकरी आणि लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सक्रीय झाले आहेत. 

परिचारक यांच्याकडे दोन साखर कारखाने, अर्बन बॅंक, शैक्षणिक संस्था अशा विविध संस्था आहेत. कामाच्या निमित्ताने त्यांच्याकडे दररोज शेकडो कार्यकर्ते आणि शेतकरी येत असतात. गेल्या महिनाभरापासून ते सर्वांपासून अलिप्त होते. त्यामुळे अनेकांची कामे थांबली होती. 

कोरोना काळात लोकांची गैरसोय होऊ नये, यासाठी आमदार प्रशांत परिचारक यांनी लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मी दररोज सकाळी आणि संध्याकाळी घरी उपलब्ध असेन, असे जाहीर केले होते. त्यानुसार आज (ता. 11 सप्टेंबर) पहिल्याच दिवशी वाड्याबाहेर त्यांना भेटण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. शेकडो लोकांनी कामाच्या निमित्ताने आमदार परिचारकांची भेट घेतली. परिचारक हे लोकांच्या कामासाठी सक्रीय झाल्याने कार्यकर्त्यांमधूनही समाधान व्यक्त केले जात आहे. 

सुधारकरपंत पारिचारक यांनी स्थापन केलेल्या संस्था टिकविणे आणि त्या चांगल्या पद्धतीने चालविणे, हे आता आपले कर्तव्य आहे. तीच मालकांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे सांगून आमदार प्रशांत पारिचारक यांनी कार्यकर्त्यांना धीर दिला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT