Dattatreya Bharane should resign as Minister of State: BJP demands
Dattatreya Bharane should resign as Minister of State: BJP demands 
मुख्य बातम्या मोबाईल

दत्तात्रेय भरणेंनी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा : भाजपची मागणी 

डॉ. संदेश शहा

इंदापूर : राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्तेत सहभागी असून इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे राज्याच्या मंत्रिमंडळात सामान्य प्रशासन राज्य मंत्री आहेत. त्याच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तालुक्‍यातील पदाधिकाऱ्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल होतो, ही गंभीर बाब आहे. त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मंत्री भरणे यांनी तत्काळ पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव यांनी केली. 

दरम्यान, प्रफुल्ल चव्हाण व सचिन तरंगे तसेच इतरांवर दाखल दरोड्याचे खोटे गुन्हे तातडीने मागे घ्यावेत. खोटे गुन्हे दाखल करणारे इंदापूरचे पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांना तातडीने निलंबित करावे, अशी मागणीही भालेराव यांनी केली. 

इंदापूर येथील स्वामीराज सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी डॉ. भरत वैरागे, रावसाहेब राखपसरे, अतुल सरतापे, कोमल शिंदे, मयूर कांबळे, संतोष कांबळे, हनुमंत ठोंबरे उपस्थित होते. 

भालेराव म्हणाले, आरोग्यासाठी असलेले दवाखाने सुरक्षित नसल्याचे भंडारा घटनेवरून लक्षात येते. जळगाव व पुणे येथे दलित अत्याचार, खून व बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. इंदापूरमध्ये दलितांवर दरोड्याचा खोटा गुन्हा दाखल झाल्याने दलित भयभीत झाले आहेत. खोटा गुन्हा रद्द व्हावा; म्हणून मंत्री भरणे यांच्या घरासमोर चव्हाण कुटुंबास उपोषण करावे लागले. 

रेडणीच्या माजी सरपंच शोभा चव्हाण व शहाबाई तरंगे यांनादेखील आपल्या कुटुंबातील सदस्यांवर खोटे गुन्हे दाखल झाल्याचे पाहून उपोषणास बसावे लागले. रेडणी ग्रामपंचायतीचे सदस्य प्रफुल्ल चव्हाण, सचिन तरंगे तसेच इतरांवर 5 लाख रुपयांच्या खंडणीचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असा दावा भालेराव यांनी केला. 

सर्व घटनांची माहिती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना देण्यात आली आहे. भाजप दलित समाजाबरोबर आहे. त्यामुळे दलितांवरील अन्याय दूर न झाल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशाराही भालेराव यांनी दिला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT