suresh dhas-pawar.jpg
suresh dhas-pawar.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

शरद पवारांच्या उपस्थितीत निर्णय होईल; तोपर्यंत संप सुरूच : सुरेश धस

सरकारनामा ब्यूरो

बीड : तुमच्या घामाच्या, रक्ताच्या, कष्टाच्या मजुरीमध्ये वाढ जाहीर झाल्याशिवाय हा संप मिटणार नाही. मंगळवारी साखर संघ आणि मजुरांच्या संघटनांची बैठक खासदार शरद पवार यांच्या बरोबर होणार आहे. त्या बैठकीमध्ये निर्णय होणार असल्याने तोपर्यंत मजुरांनी गावीच थांबावे, कारखान्याकडे जाऊ नये असे आवाहन भाजप आमदार सुरेश धस यांनी केले.

श्री. धस यांनी शनिवारी आष्टीत पत्रकार परिषद घेतली.  गोपीनाथराव मुंडे साहेब ऊसतोड मजूर, मुकादम व वाहतूकदार संघटनेचे सुखदेव सानप, तात्यासाहेब हुले, दशरथ वणवे उपस्थित होते. ऊसतोड मजूरांची दरवाढ व मुकादमांच्या कमीशनमध्ये वाढ करण्याच्या मागणीसाठी यंदा संप सुरु होताच भाजपने आंदोलनाची धुरा सुरेश धस यांच्यावर दिली. सुरेश धस यांनीही राज्यभर दौरे करुन रान पेटविले. 

धस म्हणाले, ऊसतोडणी मजुरांच्या दरांमध्ये दीडशे टक्के वाढ मिळावी, मुकादमच्या कमिशनमध्ये साडेआठरा रुपयांवरुन ३७ रुपये वाढ द्यावी आणि वाहतूक ठेकेदारांना ५० टक्के वाढ मिळावी यासह कारखान्यांवर सार्वजनिक स्वच्छतागृह असावेत आदी मागण्या केल्या. साखर संघाने मंगळवारी पुणे येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी येथे सर्व संघटना व साखर संघ यांची खासदार शरद पवार यांच्या सोबत बैठक आयोजित केली आहे. गोरगरीब वंचित, शोषित ऊसतोड मजुरांच्या पोटापाण्याच्या हा प्रश्न महत्त्वाचा असून या बैठकीत निर्णय होणार असल्याने ऊसतोड मजुरांनी आपली जागा सोडू नये.

कोयता बंद हा संप संपलेला नाही. दोन दिवस मजुरांनी कोणाच्याही दडपशाहीला बळी पडू नये. ऊसतोड मजुरांच्या गरिबीचा गैरफायदा घेऊन धाक दाखवून मजुरांना कारखान्याकडे घेऊन जायचा प्रयत्न करू नका, असा प्रयत्न कुणी वाहतूकदार ठेकेदार यांनी केल्यास त्यांचे वाहनाचे, मालमत्तेचे नुकसान झाल्यास तेच जबाबदार राहतील, असा इशाराही सुरेश धस यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT