मुंबई : राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज (ता. 8 जानेवारी) दुसऱ्यांदा विदर्भाचा दौरा केला. विदर्भ "होम टाऊन' असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी मात्र "उधार राजाचे जाहीर आभार' म्हणत मुख्यमंत्री ठाकरे यांचे उपरोधिक शब्दांत आभार मानले आहेत.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून भारतीय जनता पक्षाकडून शिवसेनेवर जोरदार टीका केली जात आहे. विशेषतः उद्धव ठाकरेंवर चोहोबाजूंनी हल्लाबोल केला जात आहे. त्याच पद्धतीने आज विदर्भाच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांवर फडणवीस यांनी ट्विटच्या माध्यमातून टीका केली आहे.
ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अधिवेशन वगळता 14 महिन्यांतील आज पहिला नागपूर दौरा. या दौऱ्यापूर्वी कालच शेतकऱ्यांच्या अंतिम मदतीचा जीआर जारी करण्यात आला आहे. पूर्व विदर्भातील जिल्ह्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रचंड अशी 11 कोटी रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली. "उधार' राजाचे जाहीर आभार! असे म्हणत त्यांनी ठाकरे यांना टोमणा लगावला आहे.
सत्तेवर आल्यानंतर साधारण वर्षभरानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी विदर्भाचा दुसऱ्यांदा दौरा केला आहे. यापूर्वी त्यांनी समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी आले होते. आज त्यांनी गोसे खुर्द प्रकल्पाची भेट दिली. विदर्भ हा माझ्यासाठी जिव्हाळ्याचा आणि तेवढाच महत्त्वाचा आहे. विदर्भातील रखडलेल्या सर्व प्रकल्पांची पाहणी करून तेथील अडचणी समजून प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पुढील काळात उपाययोजना करणार आहे, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी धरणाच्या दरवाजांची पाहणी केली. त्यानंतर त्यांना क्रमांक दोनचे दार उघडून दाखवण्यात आले. दोन मिनिटांसाठी या जलाशयातून पाणी सोडण्यात आले. यानंतर शासकीय अधिकाऱ्यांची बैठक गोसी खुर्द प्रकल्पाच्या राजीव टेकडी या परिसरात झाली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.