sanjay kakade about devendra fadnavis
sanjay kakade about devendra fadnavis 
मुख्य बातम्या मोबाईल

`देवेंद्र फडणवीस हेच माझे मोदी आणि तेच माझे शहा`

उमेश घोंगडे

पुणे : राज्यसभेच्या तिसऱ्या जागेवर उमेदवारी मिळविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्याची गरज पडणार नाही. माझ्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र हेच मोदी आणि शहा आहेत. मी तर त्यांचा मोहरा आहे, या शब्दात खासदार संजय काकडे यांनी फडणवीस यांच्याशी असलेल्या त्यांच्या निष्ठा स्पष्ट केल्या.

माझ्या खासदारकीसाठी पंतप्रधान मोदी व केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याशी मी बोलण्याची गरज पडणार नाही.फडणवीस हेच त्यांच्याशी बोलतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. मी तर फडणविसांचा मोहरा आहे, असे सांगत ते माझ्यासाठी नक्की प्रयत्न करतील, असे खासदार काकडे यांनी सांगितले.

राज्यसभा निवडणुकीत भाजपाला तीन जागा निवडून आणणे शक्‍य आहे. त्यातील दोन जागांवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले व छत्रपती उदयनराजे भोसले यांची वर्णी लागण्याची शक्‍यता आहे. तिसऱ्या जागेसाठी कोण याची चर्चा आता सुरू झाली आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री व माजी खासदार हंसराज आहिर, महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा व महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर तसेच खासदार संजय काकडे, अमर साबळे यांच्या नावाची चर्चा होती. त्यात आता भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू यांच्या नावाची भर पडली आहे. या चार जणांमधून एकाला तिसरी जागा मिळेल, असे सांगण्यात येत आहे.

या तिसऱ्या जागेवर आपला दावा सांगताना खासदार काकडे यांनी छत्रपती उदयराजेंचे पक्षासाठी योगदान काय ? असा प्रश्‍न उपस्थित केल्याने चर्चेला उधाण आले. ते म्हणाले, "" पक्षाची पुणे महापालिकेत सत्ता आणण्यासाठी मी केलेले काम सर्वांनी पाहिले आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीतही मोठी जबाबदारी पाडली आहे. पक्ष नोंदणीत दीड लाख सदस्यांची नोंदणी एकट्याने केली आहे. गेल्यावेळी मी स्वतंत्र खासदार म्हणून निवडून आला. त्यानंतर भाजपाचा सहयोगी सदस्य झालो. यावेळी मी पक्षाकडे अधिकृत उमेदवारी मागत आहे. पक्ष याचा नक्की विचार करेल. पक्षाने उमेदवारी दिली नाही तरी मी शांत बसेन. कारण आमचा पक्ष एक शिस्त पाळणारा पक्ष आहे. पक्षाच्या चौकटीत काम करणारा मी कार्यकर्ता आहे.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT