Discuss LIC Disinvesment issue in Parliament Sena MP Arvind Sawant to PM
Discuss LIC Disinvesment issue in Parliament Sena MP Arvind Sawant to PM 
मुख्य बातम्या मोबाईल

एलआयसी निर्गुंतवणुकीबाबत चर्चेसाठी खासदार अरविंद सावंत यांचे पंतप्रधानांना पत्र 

सरकारनामा ब्युरो

मुंबई : भारतीय आयुर्विमा महामंडळ या सर्वात मोठ्या सरकारी मालकीच्या विमा कंपनीत निर्गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी या विषयावर संसदेत चर्चा करावी अशी मागणी करणारे पत्र शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पाठवले आहे.

सरकारने आता एलआयसीच्या निर्गुंतवणुकीची प्रक्रिया सुरू केली असून त्यासाठी सल्लागार नेमण्याचीही तयारी केली आहे. या प्रक्रियेला इन्शुरन्स एम्प्लॉईज युनियनने विरोध केला असून तसे पत्र त्यांनी सावंत यांच्याकडे पाठवले आहे. त्याचा आधार घेऊन सावंत यांनी वरील मागणी पंतप्रधानांकडे केली आहे.

निर्गुंतवणूक करताना एलआयसी मधील सरकारचा हिस्सा विकण्यात येईल तसेच एलआयसीची शेअर बाजारात नोंदणीही करण्यात येईल. या निर्णयाचे एलआयसीच्या विमा धारकांवर आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होतील अशी भीतीही सावंत यांनी व्यक्त केली आहे. आतापर्यंत एलआयसीचा झालेला विस्तार हा सरकारी पैशातून नव्हे तर बहुतांश विमाधारकांच्या पैशातून झाला आहे. सर्वच सरकारी विमा कंपन्यांनी गुंतवणूकदारांचा आणि विमा धारकांचा विश्वास कमावला आहे. उलट खाजगी कंपन्यांनी हा विश्वास अजूनही मिळवला नाही. देश आर्थिक संकटात असताना याच सरकारी विमा कंपन्या देशाच्या मदतीला धावून आल्या आहेत, असेही सावंत यांनी दाखवून दिले आहे.

३२ लाख कोटी रुपयांची मालमत्ता असलेली एलआयसी ही जगातील मोठ्या विमा कंपन्यांपैकी आहे. एलआयसी मुळे विमाधारकांना सुरक्षा आणि चांगले फायदे मिळतात. राष्ट्रउभारणीच्या कामातही एलआयसी ने मोठा वाटा उचलला आहे. मात्र आता निर्गुंतवणूकीनंतर एलआयसी खाजगीकरणाच्या वाटेवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरील हेतू नष्ट होतील आणि केवळ खाजगी व्यक्तींचा फायदा होईल. अशा स्थितीत एलआयसी ही शंभर टक्के सरकारी मालकीची रहावी अशी मागणी युनियनच्या पत्रात आहे. त्यानुसार सरकारने असा निर्णय घेण्यापूर्वी संसदेत चर्चा करावी अशी मागणी सावंत यांनी केली आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT