कोल्हापूर : सरकारच्या कर्जमाफी योजनेचा लाभ न मिळाल्याने थकबाकीदार राहिलेल्या कर्जदारांना राष्ट्रीयकृत्त बॅंकांनी कर्ज न दिल्यास अशा शेतकऱ्यांना कोल्हापूर जिल्हा सहकरी बॅंक कर्ज देईल, अशा विश्वास संचालक प्रताप माने यांनी दिला. विनाकारण कोणतीही समस्या नसताना प्रसिद्धीसाठी अज्ञान प्रकट करू नका, असा टोलाही माने यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांना त्यांचे नाव न घेता या पत्रकात लगावला.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण पीक कर्जाच्या तब्बल 85 टक्केपेक्षा जास्त पीककर्ज ही एकटी जिल्हा बॅंक देते. दरवर्षी 32 कोटी रुपयांचा तोटा सहन करून बॅंक पीककर्ज पुरवठा करते. यापूर्वी बॅंकेने 1800 कोटी रुपये कर्ज दिल्याची माहिती माने यांनी दिली आहे.
कर्जमाफी योजनेतील 7904 शेतकऱ्यांचे 46 कोटीची रक्कम मिळालेली नाही. यामध्ये राष्ट्रीयकृत बॅंकांशी संबंधित शेतकऱ्यांचे 30 कोटी आहेत, तर केडीसीसी बॅंकेच्या कर्जदार खातेदारांचे 16 कोटी आहेत. बॅंकांना कर्ज माफीचे पैसे आले नाहीत, त्या बॅंकांना हमी देऊन रिझर्व्ह बॅंकेने आदेशित केल्याप्रमाणे त्यांना बॉण्डसुद्धा दिले आहेत, त्यामुळे राष्ट्रीयकृत बॅंकांना कर्ज द्यावे लागेल. ज्यांना व्यापारी बॅंका कर्ज देणार नाहीत, त्यांना जिल्हा बॅंक कर्ज देईल, असे या पत्रकात म्हटले आहे.
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान व दोन लाखांवरील कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. या दोन्ही कर्जदार शेतकऱ्यानी आपले कर्ज 30 जूनपर्यंत भरले पाहिजे. त्यानंतर माहिती घेऊन उर्वरित महात्मा फुले कर्जमाफी व प्रोत्साहनपर अनुदान व दोन लाखांवरील कर्जमाफीचे पैसे निधीच्या उपलब्धतेनुसार देण्याचे सरकारने जाहीर केले आहे. परंतु; नियमित भरणारे व दोन लाखांवरील राज्यभरातील शेतकरी 30 जूनची मुदत वाढवण्याची मागणी करीत आहेत. सरकारने ती जर मान्य केली तर सवलत मिळण्यास वेळ लागेल असे वाटते, असेही या पत्रकात म्हटले आहे.
यापूर्वी 26 मे 2020 रोजी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबतचे सविस्तर निवेदन प्रसारमाध्यमांना दिले होते. ते पूर्ण आणि शुद्ध मराठीतच होते. ज्यांचे इंग्रजीमध्ये शिक्षण झाले आहे, त्यांनी मराठीत समजून घेऊन आपली प्रतिक्रिया व्यक्त करावी. लोकांसाठी काहीतरी करतो हे दाखवण्याच्या नादात स्वतःचे अज्ञान दाखवून, स्वतःचे हसे करून घेऊ नये, असाही टोला या पत्रकात लगावण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.