Dr Sanjay Dhurjad
Dr Sanjay Dhurjad 
मुख्य बातम्या मोबाईल

म्हणून नाशिकमध्ये रुग्णालये बंद करण्याची आली वेळ : एका डाॅक्टरने मांडली व्यथा

संपत देवगिरे

नाशिक : नाशिकमधील डाॅक्टरांनी रुग्णालये बंद करणार असल्याची घोषणा केल्यानंतर खळबळ उडाली आहे. कोरोनाच्या परिस्थितीत डाॅक्टरांनी असा निर्णय का घेतला यावर उलटसुलट चर्चा होत आहेत. डाॅक्टरांनी त्यांच्या परीने कारणे यानिमित्त सांगण्याा प्रयत्न केला आहे. (Doctors from Nashik decided o close hospitals) 

कोरोनामुळे वैद्यकीय क्षेत्र व डॅाक्टर्स यांच्या कामकाज, सुविधा व उपचारांत नवी आव्हाने उभी राहिली. त्यातही व्यवस्था, समाज व नेत्यांकडून मिळणारा प्रतिसाद काही बरा नव्हता. त्यामुळे या क्षेत्रातील अनेक दिवसांची खदखद व भावनांचा स्फोट झाला. शहरातील कोरोना रुग्णालये बंद करण्यामागे हीच कारणे आहेत.

यासंदर्भात अस्थिरोगतज्ञ डॉ. संजय धुर्जड यांनी एक अनावृत्त व्यथा, वैद्यकीय क्षेत्राची बाजू मांडली आहे. ते म्हणाले, येथे एक आंदोलन घडू पहात आहे. वर्षभरापासून कोविडच्या महामारीत शेकडो खाजगी रुग्णालये काम करीत होती. त्यांनी आता हॉस्पिटल्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या दृष्टीने ते एक आंदोलन आहे. त्याचे कारण समजून घेणे गरजेचे आहे. कोविडमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांची मानसिकता समजून घेतली पाहिजे. 

ते म्हणाले, एखाद्या सैनिकाला सांगितले की तुम्हाला युद्ध जिंकावेच लागेल. अशा वेळी कुठल्याही परिस्थितीचा विचार न करता, सैनिक जीवाची बाजी लावून लढेल. मात्र त्यासोबतच त्याला स्वतःच्या बाचावाकरिता बुलेटप्रूफ जॅकेट स्वतः  विकत घ्यावे लागेल. कोणतिही सुरक्षा मिळणार नाही. बुलेट्स वाया घालवल्या तर कोर्ट मार्शल केला जाईल. दोषी आढळल्यास शिक्षा केली जाईल, तर तो कसा लढेल?. डॅाक्टरांचे देखील तसेच आहे. आज ते लढण्याच्या स्थितीत आहेत की नाही, हे बघणं जास्त गरजेचं आहे. सर्व कोविड योद्ध्यांचं असच झालेलं आहे. 

डॉ. धुर्जड म्हणाले, कोविड रुग्णाचे उपचार करताना अनेक आघाड्यांवर लढावं लागतं. स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करावे लागते. डॉक्टरांना काही झाले तर घरच्यांचं काय होईल? ही काळजी असते. रुग्णासंख्या जास्त असल्याने जास्त काम करावे लागते. बिल आकारणीला मर्यादा घालून दिल्या, परंतु स्टाफच्या पगाराला मर्यादा नाही. औषधे, ऑक्सिजन, पीपीइ किट, कोविडच्या कचऱ्याची विल्हेवाट, अन्य किमतींना मर्यादा नाही. शंभर टक्के अॅडव्हान्स पैसे देऊनही औषधे व ऑक्सिजन न मिळणे, पडेल त्या किमतीत विकत घेणे, त्यात रुग्णांकडून अॅडव्हान्स अथवा डिपॉजीट मागायचे नाही म्हणजेच स्वखर्चाणे उपचार करायचे. जीव वाचविण्यात अपयश आलेच तर बिल बुडवण्याची मानसिकता. तक्रार करू अशी धमकी देणे, बिल ऑडिट केल्यानंतरही डिस्काउंट करण्यासाठी दबाव आणणे, अशा असंख्य अडचणी आहेत.

सतत बदलणारे शासकीय धोरण, नियमावली, प्रोटोकॉल, परवाने, विविध माहितीचे संकलन अशा एक ना अनेक अडचणी भेडसावतात. हे कमी की काय म्हणून, कितीतरी भाऊ, दादा, नाना, अण्णांचे बिल कमी करण्यासाठी फोन येतात, स्वयंघोषित रॉबिनहूडचा सुळसुळाट आहे. जाहीरपणे डॉक्टर्स आणि हॉस्पिटलची बदनामी करणे, धमकावणे, प्रतिमा मलिन करणे, खाजगी मालमत्तेचे नुकसान करणे, डॉक्टरांना शिवीगाळ करत अश्लील भाषा वापरणे, गदारोळ करणे, अपमान करणे असे कृत्य केलेले आहे. अशा थकलेल्या आणि खचलेल्या मनस्थितीत काम करणे अशक्य झाल्यामुळे नाईलाजाने डॉक्टरांवर हॉस्पिटल्स बंद करण्याची वेळ आली आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT