Nitin Gadkari
Nitin Gadkari 
मुख्य बातम्या मोबाईल

इलेक्ट्रिक व्हेईकल करेल देशावरचा आर्थिक भार कमी : नितीन गडकरी

राजेश चरपे

नागपूर : देशावर येणारा आर्थिक भार कमी करण्याची क्षमता इलेक्ट्रिक व्हेईकल मध्ये आहे. जैविक इंधन आज देशाची गरज आहे. सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात देशाला स्वयंपूर्ण करायचे असेल, तर क्रूड आॅईल आयातीसाठी येणारा आर्थिक भार कमी करावा लागेल. इलेक्ट्रिक व्हेईकलचा वापर देशात वाढविल्यास देशावरचा आर्थिक भार कमी होऊ शकतो, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

इंडिया एनर्जी स्टोरेज अलायन्सतर्फे आयोजित एका चर्चेत ना. गडकरी बोलत होते. वाहतुकीसाठी लागणाऱ्या इंधनापैकी आज 70 टक्के क्रूड ऑईल आयात करावे लागते. त्यामुळे निर्माण होणाऱ्या कार्बन डायऑक्साईडचे प्रमाणही वाढते. 18 टक्के कॉर्बन डायऑक्साईड राष्ट्रीय महामार्गांवर चालणाऱ्या वाहनांमुळे निर्माण होतो. जैविक इंधन किंवा इलेक्ट्रिक व्हेईकलचा वापर झाला नाही, तर हे प्रमाणात भविष्यात वाढणार. इलेक्ट्रिकवर चालणारी प्रवासी वाहने ही इंधनासाठी आर्थिकदृष्ट्या परवडणारी, प्रदूषण न करणारी शाश्वत वाहतूक प्रदान करणारी आहे, असेही ते म्हणाले.

ब्रॉडगेज मेट्रोसंदर्भात गडकरी म्हणाले, ब्रॉड गेज मेट्रोची संकल्पना नागपुरात राबविण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यासाठी इलेक्ट्रिफिकेशन तयार आहे, रेल्वे रुळही आहेत, स्टेशनही तयार आहे. एक्सप्रेस 60 किमी प्रतितास वेगाने धावते, पॅसेंजर 40 किमी प्रतितास वेगाने धावते, तर ब्रॉडगेज मेट्रो 120 किमी प्रतितास वेगाने धावणार आहे. नवीन तंत्रज्ञानाने हे शक्य झाले आहे. पॅसेंजर आणि एक्सप्रेससाठी ब्रॉडगेज मेट्रो हा योग्य पर्याय होऊ शकतो, असेही गडकरी म्हणाले.

महानगरांमधील सार्वजनिक वाहतूक इलेक्ट्रिक बसेस किंवा सीएनजी, एलएनजी इंधनाचा वापर व्हावा, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- मुंबई-पुणे, मुंबई-नाशिक, बंगलोर-चेन्नई, दिल्ली-जयपूर अशा वाहतुकीसाठी डबल डेकर इलेक्ट्रिक बसचा वापर व्हावा. यामुळे इंधनाच्या खर्चात प्रचंड बचत होईल आणि ही प्रदूषणमुक्त वाहतूक असेल.    (Edited By : Atul Mehere)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT