adcc5.jpg
adcc5.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

सेवा संस्थांना ताकद द्या : बाळासाहेब थोरात यांच्या सूचना

मुरलीधर कराळे

नगरः "सेवा संस्था या सहकाराच्या कणा आहेत. त्यांना ताकद दिली पाहिजे. अध्यक्ष, सचिव, संचालकांच्या बैठका घेऊन त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांबाबत मार्गदर्शन करा,'' अशा सूचना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज दिल्या. 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची 63वी सभा ऑनलाइन पद्धतीने आज बॅंकेच्या सहकार सभागृहात झाली. त्या वेळी मंत्री थोरात बोलत होते. व्यासपीठावर ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार मोनिका राजळे, बॅंकेचे अध्यक्ष उदय शेळके, उपाध्यक्ष माधवराव कानवडे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, संचालक भानुदास मुरकुटे, तसेच अन्य संचालक उपस्थित होते. संचालक प्रशांत गायकवाड ऑनलाइन उपस्थित होते. 

थोरात म्हणाले, ""बॅंकेवर ठेवीदारांचा विश्‍वास असल्यानेच सुमारे आठ हजार कोटींच्या ठेवी आहेत. या रकमेचे नियोजन करून शेतकऱ्यांचे हित सांभाळा. बॅंकेत एक संशोधन विभाग असावा. वसुलीची गती वाढवावी. सध्याची संचालक मंडळाची टीम चांगली आहे.'' 

मंत्री तनपुरे म्हणाले, ""महावितरण कंपनी अडचणीत आहे. सुमारे 70 हजार कोटींची थकबाकी आहे. शेतकऱ्यांना थकीत वीजबिलात सुमारे 60 ते 70 टक्के सूट दिली जात आहे. त्यासाठी जिल्हा बॅंकेने कर्जयोजना राबवावी.'' 

प्रास्ताविकात अध्यक्ष शेळके यांनी बॅंकेच्या ताळेबंदाची माहिती दिली. 300 एटीएम, मोबाईल ऍप, ऑनलाइन सेवा आदी विविध योजनांबाबत त्यांनी माहिती दिली. प्रारंभी कानवडे यांनी उपस्थितांचे स्वागत करून दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण केली. संचालक करण ससाणे, गणपतराव सांगळे यांनी विषयांचे वाचन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनीही बॅंकेबाबत माहिती दिली. सूत्रसंचालन राजेंद्र टाक यांनी केले. उपाध्यक्ष कानवडे यांनी आभार मानले. काही संचालक कोरोना पॉझिटिव्ह असल्याने ते उपस्थित राहू शकले नाही. माजी संचालक सबाजी गायकवाड, श्रीरामपूर बाजार समितीचे सभापती सचिन गुजर यांनी मुद्दे मांडले. 

थकबाकीतही नगर पुढे 

मंत्री तनपुरे यांनी वीजबिलाबाबत चांगली योजना आणली आहे. महावितरणची राज्यात 70 हजार कोटींची थकबाकी आहे. त्यात नगरचा आकडा पाच हजार कोटींचा आहे. थकबाकीतही नगर पुढे आहे. सवलत जाऊन केवळ 1700 कोटी भरायचे आहेत. शेतकऱ्यांना सवलत जाऊन 50 टक्के रक्कम भरायची असल्याने, ती बॅंकेतून कर्जाच्या स्वरूपात देता येईल का, असा विचार करावा, असे थोरात यांनी सांगितले. 

सबाजी गायकवाड यांनी वेधले लक्ष 

बॅंकेतील काही शाखांतील कर्मचारी नीट बोलत नाहीत. पाच मिनिटे उशीर झाला तरीही कॅश घेत नाहीत, असा आरोप ज्येष्ठ नेते सबाजी गायकवाड यांनी केला. त्यावर बोलताना थोरात यांनी, कर्मचाऱ्यांवर येणाऱ्या ताणामुळे असे होऊ शकते. त्यामुळे बॅंकेत आवश्‍यकतेनुसार कर्मचाऱ्यांची भरती करावी. त्यांना कामांबाबत प्रशिक्षण द्यावे, अशा सूचना केल्या. 

कर्डिलेही तरुणच आहेत 

अध्यक्ष शेळके यांनी प्रास्ताविकात, बहुतेक संचालक तरुण असल्याचे सांगितले. त्यावर कर्डिले हसले. लगेचच शेळके यांनी, तुम्ही पण तरुण आहात साहेब, असे म्हणताच सभागृहात हंशा पिकला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT