Expired Injections found in Ulhasnagar Hospital
Expired Injections found in Ulhasnagar Hospital 
मुख्य बातम्या मोबाईल

उल्हासनगरमध्ये सरकारी रुग्णालयात क्षयरोगाची मुदत संपलेली इंजेक्‍शने

सरकारनामा ब्युरो

उल्हासनगर : उल्हासनगरमधील सरकारी मध्यवर्ती रुग्णालयाला ठेकेदाराने क्षयरोगावरील एक्‍सपायरी डेटच्या इंजेक्‍शनचा साठा दिल्याचे उघड झाले आहे. स्थायी समिती सभापती राजेश वधारिया यांनी याचा भांडाफोड केला असून याबाबत भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला. दरम्यान, हा बॉक्‍स बाजूला ठेवण्यात आल्याने अनर्थ टळला आहे.

क्षयरोगावर कॅनॅमाईसीन हे इंजेक्‍शन उपायकारक असल्याने ते रुग्णांना देण्यात येते. ठेकेदाराने 3 जून 2020 रोजी सरकारी मध्यवर्ती रुग्णालयात या इंजेक्‍शनचा साठा दिला असून हे इंजेक्‍शन जुलै 2017 मध्ये तयार करण्यात आलेले आहे. जून 2019 मध्ये त्याची मुदत संपलेली असतानाही हे इंजेक्‍शन रुग्णालयाला देण्यात आल्याचा प्रकार समजताच स्थायी समिती सभापती राजेश वधारिया यांनी उल्हासनगर पालिका आयुक्त समीर उन्हाळे, शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुधाकर देशमुख, पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुहास मोहनाळकर यांच्याकडे इंजेक्‍शने पुरवणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी केली आहे.

दरम्यान, आज भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी उल्हासनगरचा दौरा केला, त्या वेळी त्यांनी उपजिल्हा चिकित्सक डॉ. जाफर तडवी यांना जाब विचारला असता, हा बॉक्‍स आम्ही बाजूला ठेवलेला असून त्याच्यातील इंजेक्‍शनांचा वापर केला नसल्याची माहिती त्यांनी दिली.

याबाबत रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुधाकर शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, या इंजेक्‍शनचा बॉक्‍स उल्हासनगर महानगरपालिकेने दिला होता. आमच्या येथील नर्सच्या निदर्शनास एक्‍सपायरी डेट लक्षात आल्यावर तिने ही माहिती कळवली. आम्ही पालिकेला तसे पत्राद्वारे कळवले असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले. पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुहास मोहनाळकर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा मोबाईल नॉट रिचेबल मिळत होता.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT