The factionalism within the NCP increased in Solapur
The factionalism within the NCP increased in Solapur 
मुख्य बातम्या मोबाईल

राष्ट्रवादीतील वाद पेटला : जिल्हाध्यक्षांनी केलेल्या निवडीस कार्याध्यक्षाकडून स्थगिती 

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि गटबाजी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत. पूर्वी मोहिते-पाटील विरुध्द शिंदे बंधू यांच्यात असलेली गटबाजी संपली. आता गटबाजीने नवे रुप घेत जिल्हाध्यक्ष बळिराम साठे विरुध्द जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील असे चित्र समोर येत आहे. जिल्हाध्यक्ष साठे यांनी नियुक्त केलेल्या दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्षास कार्याध्यक्ष पाटील यांनी स्थगिती दिली आहे. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीतील वाद चांगलाच पेटण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादीला लागलेले गटबाजीचे ग्रहण पक्षाला कुठपर्यंत घेऊन जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (The factionalism within the NCP increased in Solapur)

नव्या जुन्यांच्या वादामुळे माळशिरसची राष्ट्रवादी कार्यकारिणी स्थगित ठेवण्यात आली. पंढरपुरातील गोंधळ मिटविण्यासाठी प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना यावे लागले. या दोन तालुक्यां‍तील खदखद कायम असताना आता दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील पदाधिकारी बदलावरुन राष्ट्रवादीतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. 

उत्तर सोलापूर आणि मोहोळ तालुका हे शेजारी तालुके. या दोन्ही तालुक्‍यांचा समावेश मोहोळ ह्या एकाच मतदार संघात असल्याने मोहोळ आणि उत्तर सोलापूर तालुक्‍याच्या राजकीय घडामोडी मतदार संघावर परिणाम करतात. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे उत्तर सोलापूर तालुक्‍यातील, तर राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील हे मोहोळ तालुक्‍यातील आहेत. जिल्हा राष्ट्रवादीतील अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष ही दोन्ही पदे मोहोळ या एकाच विधानसभा मतदार संघात आहेत. त्यामुळे मोहोळ तालुक्‍यातील हा वाद जिल्हा राष्ट्रवादीतील वाद आणि गटबाजी वाढवू लागला आहे. 

दक्षिण सोलापूरचे तालुकाध्यक्ष सुभाष पाटील यांना हटवून तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी बिपीन करजोळे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष साठे यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मदतीने केलेला हा बदल कार्याध्यक्ष पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मदतीने स्थगित करण्याचा निर्णय  घेतला आहे. त्यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्‍यात कधी नव्हे ती राष्ट्रवादी कॉंग्रेस चर्चेत आली आहे. जिल्हाध्यक्ष व कार्याध्यक्ष यांच्यात सुरु झालेली धुसफुस कुठपर्यंत जाते? यामध्ये प्रदेशचे नेते काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

जिल्हा नेतृत्वाची सोलापूर राष्ट्रवादीला गरज

सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीत प्रत्येक तालुक्‍याचा एक नेता तयार झाला आहे. हे नेते त्यांच्या तालुक्‍यापुरतेच बघतात. संपूर्ण सोलापूर जिल्हा डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीचे काम करणाऱ्या नेतृत्वाची सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीला उणीव आहे. जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील हे जरी मोहोळचे असले तरीही त्यांनी संपूर्ण जिल्हा डोळ्यासमोर ठेवून पक्षाचे काम सुरु केले आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जनता दरबार आयोजित केला आहे, त्यामुळे राष्ट्रवादीकडून प्रभावी वातावरणनिर्मिती होऊ लागली आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT