Heeraben 24.jpg
Heeraben 24.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

शेतकऱ्याने लिहिलं मोदींच्या आईला भावनिक पत्र..

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : कृषी कायद्यांना स्थगिती देण्याचा प्रस्तावही फेटाळल्यानंतर कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकरी संघटनांना शुक्रवारी निर्वाणीचा इशारा दिला. कायद्यांवरील चर्चेदरम्यान कृषीमंत्र्यांसह शेतकरी संघटनांही ठाम राहिल्याने काही मिनिटांतच बैठक संपली. बैठकीदरम्यान कृषीमंत्री शेतकरी संघटनांच्या नेत्यांवर भडकल्याचे दिसून आले. तिन्ही कायदे चांगले असल्याचे सांगत त्यांनी यापेक्षा चांगले काही करू शकत नाही, असे स्पष्ट केले.

कृषी कायदे रद्द करावे, यासाठी पंजाबच्या एका शेतकऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हीराबेन यांना भावनिक पत्र लिहिलं आहे. "कृषीविषयक तीनही कायद्याविरोधात देशभर आंदोलन सुरू आहे. हे तीनही कायदे रद्द करण्यासाठी आपण नरेंद्र मोदी यांची मनधरणी करावी," अशा आशयाचे पत्र हरप्रीत सिंह (फिरोजपूर, पंजाब) यांनी लिहिले आहे. ते आंदोलनात सहभागी आहेत. हरप्रीत सिंह यांना आशा आहे की हीराबेन या आपल्या मुलाची मनधरणी करण्यात यशस्वी ठरतील. 

देशातील हवामान, कृषी कायद्याला विरोध करणारे शेतकरी, शेतकऱ्यांचे योगदान अशा विविध मुद्दांवर शंभर वर्षीय हीराबेन यांना हरप्रीत सिंह यांनी भावुक पत्र लिहिले आहे. "मी हे पत्र खूप भावनिक होऊन लिहितो आहे. तुम्हाला माहित आहे की तीनही कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी देशभरातील शेतकरी कडाक्याच्या थंडीत दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहेत. रस्त्यावर राहून शेतकरी अनेक दिवसापासून आंदोलन करीत आहेत. या आंदोलनात ज्येष्ठ शेतकरी, महिला, लहान मुलांसह सहभागी आहेत. कडाक्याच्या थंडीत शेतकरी आजारी पडत आहेत. काहीचा मृत्यू झाला आहे. हे आंदोलन सर्वांच्या काळजीचा विषय ठरले आहे," असे पत्रात म्हटलं आहे.    

"आपल्या आईची विनंती, कुणीही अमान्य करू शकत नाही, फक्त एक आईच आपल्या मुलाला आदेश देऊ शकते. आपण जर मोदींची मनधरणी केली, हे कायदे रद्द झाले तर सारा देश आपल्याला धन्यवाद देईल," असे हरप्रीत सिंह यांनी पत्रात लिहिलं आहे.

 
कृषी कायद्यांवर तोडग्यासाठी शुक्रवारी दुपारी चर्चेची बारावी फेरी झाली. केंद्र सरकारने यापुर्वीच तिन्ही कायद्यांना स्थगिती देण्याचा निर्णय जाहीर केला होता. तसा प्रस्ताव शेतकरी संघटनांसमोर ठेवला होता. पण संघटनांनी हा प्रस्तावही फेटाळून लावला. या संघटना कायदे रद्द करण्याच्या भुमिकेवर ठाम आहेत. यापार्श्वभूमीवर शुक्रवारी बैठकीला सुरूवात झाली. कृषीमंत्र्यांनी कायद्यांना स्थगितीचाच प्रस्ताव मांडला. पण शेतकरी नेत्यांना आपली भुमिका कायम ठेवल्याने पुढे चर्चा झाली नाही. काही मिनिटांतच बैठक आटोपती घेण्यात आली. 

'तिन्ही कृषी कायदे योग्य आहेत. सरकारच्या प्रस्तावावर जरूर विचार करा व चर्चा करून निर्णय कळवा. तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद. चर्चेची पुढची तारीख निश्‍चित नाही' असे सांगून कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर व अन्य दोन्ही मंत्री दुपारी एकच्या सुमारास शेतकऱ्यांसमोर हात जोडून बैठकीच्या दालनातून निघून गेले. दुपारी चारच्या आसपास मंत्री पुन्हा बैठकीच्या दालनात आले व नंतरच्या काही मिनिटांतच बैठकच संपली.

 Edited  by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT