Funeral at Sarkolit on Bharat Bhalke; Sharad Pawar will be present
Funeral at Sarkolit on Bharat Bhalke; Sharad Pawar will be present  
मुख्य बातम्या मोबाईल

आमदार भारत भालकेंवर सरकोलीत अंत्यसंस्कार; शरद पवार उपस्थित राहणार

सरकारनामा ब्यूरो

पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्यावर आज (ता. २८ नोव्हेंबर) दुपारी चार वाजता सरकोली (ता. पंढरपूर) या त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, पालकमंत्री दत्तात्रेय भरणे हे येणार आहेत. 

दरम्यान, भारत भालके यांचे पार्थिव शनिवारी (ता. २८ नोव्हेंबर) सकाळी पुण्यातून पंढरपूकरडे रवाना करण्यात आले. आज सकाळी ११ वाजता भालके यांचे पार्थिव गुरसाळे येथील विठ्ठल सहकरी साखर कारखान्यावर अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्या ठिकाणी प्रशासन आणि कामगारांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर पंढरपूर शहरातील नागरिकांसाठी शिवाजी चौकात अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आले होते. तेथून विठ्ठल मंदिरास प्रदक्षिणा घालून त्यांचे पार्थिव दर्शनासाठी मंगळवेढ्याला नेण्यात आले.

आमदार भारत भालके यांचे  शुक्रवारी (ता. २७ नोव्हेंबर) मध्यरात्री साडेअकराच्या पुणे येथे उपचारादरम्यान निधन झाले होते. कोरोनामुळे ते काही दिवसांपासून त्रस्त होते. त्यांच्यावर पुणे येथील रूबी हाॅस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. तसेच आमदार भालकेंना किडनी, मधुमेह आणि रक्तदाब आदींचाही त्रास होता. त्यातच कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांची प्रकृती खालावली होती आणि शुक्रवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

पंढरपूर तालुक्यातील भीमा आणि माण नदीकाठी असलेले सरकोली हे आमदार भालके यांचे मूळगाव. सध्या ते सरकोली येथेच राहत होते. सरकोली येथील त्यांच्या शेतात दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या वेळी राज्यातील राष्ट्रवादीचे नेते, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

शेतकरी असलेल्या भालके यांनी अल्पावधितच राजकय क्षेत्रात मोठी झेप घेतली होती. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या तीन माजी मुख्यमंत्र्यांना सरकोली येथे बोलावून त्यांचा सन्मान केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT