मुख्य बातम्या मोबाईल

टीकेला उत्तर द्या; पण भाषा सांभाळा : राजनाथसिंह

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष व गृहमंत्री अमित शहा आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर विरोधी पक्ष सातत्याने हल्ले चढवीत आहे. भाजप खासदारांनी त्यांच्या टीकेला ठोस प्रत्युत्तर द्यावे; मात्र, भाषेचा दर्जा घसरू देऊ नये, अशी सूचना संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज सत्तारूढ खासदारांना केली. 

महत्त्वाच्या विधेयकांच्या वेळीही अनेक भाजप खासदार दांड्या मारतात याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी अतिशय नाराज असल्याचाही इशारा त्यांनी दिला, असे सूत्रांनी सांगितले. 

भाजप संसदीय पक्षाची बैठक आज सकाळी झाली. यात माध्यमांना पूर्ण मज्जाव असतो. पंतप्रधान मोदी आज झारखंडच्या निवडणूक प्रचारासाठी गेल्याने राजनाथसिंह यांनी बैठक घेतली. शहा, जे. पी. नड्डा, संसदीय मंत्री प्रल्हाद जोशी आदी उपस्थित होते.

भाजप खासदार प्रज्ञा ठाकूरने संसदेत तोडलेले तारे, अनंत हेगडे यांचे बुलेट ट्रेनबाबतचे वादग्रस्त वक्तव्य व त्यानंतर झालेला वाद, या पार्श्वभूमीवर राजनाथसिंह यांनी पक्षाच्या खासदारांना व नेत्यांना, भाषेची मर्यादा सांभाळण्याचा सल्ला दिला. 

संसदेत खासदारांच्या अनुपस्थितीबाबत कितीही वेळा सांगून फरक पडत नसल्याने राजनाथसिंह म्हणाले, की नागरिकत्व दुरुस्ती विधेयक शहा संसदेत (म्हणजे लोकसभेत) मांडतील तेव्हा पक्षाच्या खासदारांनी उपस्थित राहायलाच हवे. कलम 370 रद्द करण्याइतकेच हेही विधेयक महत्त्वाचे आहे. या अधिवेशनात अनेक महत्त्वाचे प्रसंग आले तेव्हा बरेच खासदार सभागृहात नव्हते. 

विधेयक छोटे असो की मोठे, खासदारांनी संसदेत हजर राहिलेच पाहिजे. आमच्या सर्वोच्च नेत्यांबद्दल तीव्र व पातळी सोडून टीका होते तेव्हा आम्ही आक्रमकपणे प्रत्युत्तर दिलेच पाहिजे; पण विरोधी पक्षनेत्यांच्याही खालच्या पातळीवर आम्ही घसरले पाहिजे, असे नाही. भाजप कार्यकर्त्यांनी भाषेची मर्यादा सांभाळलीच पाहिजे, असे त्यांनी सांगितले. 

कुपोषणमुक्तीसाठी "मातृवंदन' 
महिला व बालकल्याणमंत्री स्मृती इराणी यांनी देशातील कुपोषणाच्या परिस्थितीची व मे 2018 पासून सुरू झालेल्या पोषण अभियान मोहिमेबाबत माहिती दिली. देशभरातील अंगणवाडी कार्यकर्त्यांना स्मार्टफोन दिले गेले आहेत. याशिवाय कुपोषण मुक्तीसाठी "मातृवंदन' योजनाही राबविली जात आहे. भाजप खासदारांनी याचा आढावा घेऊन आपापल्या भागातील परिस्थिती आपल्याला सांगावी, असेही त्या म्हणाल्या. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT