In Gokul's election, MLA Vinay Kore will get two seats
In Gokul's election, MLA Vinay Kore will get two seats  
मुख्य बातम्या मोबाईल

आमदार विनय कोरे यांची मागणी होणार पूर्ण 

सरकारनामा ब्यूरो

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत आमदार विनय कोरे यांनी सत्तारूढ गटासोबत यावेत, यासाठी माजी आमदार महादेवराव महाडीक प्रयत्नशील आहेत. आमदार कोरे यांनी दोन जागांची मागणी केली आहे, सुरुवातीला त्यांना एकच जागा देण्याची तयारी सत्तारूढ गटाची होती. पण, शाहूवाडी तालुक्‍यातील सरूडकर गट विरोधात जाण्याची शक्‍यता असल्याने कोरे यांना दोन जागा देऊन त्यांना सोबत घेण्याची तयारी सत्तारूढ गटाने दर्शविली आहे. 

गोकुळ निवडणुकीची रणनिती ठरविण्यासाठी सत्तारूढ गटाचे नेते आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार महादेवराव महाडीक यांनी शुक्रवारी (ता. 19 मार्च) बैठक बोलवली होती. त्यात सत्तारुढ गटाने विनय कोरे यांच्याबाबत लवचिक भूमिका घेत दुसरी जागा देण्याची तयारी दर्शविली आहे. दरम्यान, आजच्या बैठकीकडे पाच विद्यमान संचालकांनी पाठ फिरवली. यावरून हे पाचही संचालक सत्तारूढ गटासोबत राहणार नाहीत, हे आता स्पष्ट झाले आहे. 

या बैठकीला ज्येष्ठ संचालक विश्‍वास पाटील, अरूण डोंगळे, श्रीमती जयश्री पाटील-चुयेकर, आमदार राजेश पाटील व माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर यांच्या मातोश्री अनुराधा यांनी पाठ फिरवली. "गोकुळ'च्या ताराबाई पार्कातील कार्यालयात सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत नेत्यांनी तालुकानिहाय संपर्काचा आढावाही घेतला. 

"गोकुळ'च्या निवडणुकीत सत्तारूढ विरोधात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांचे पॅनेल असणार हे जवळपास निश्‍चित झाले आहे. या दोन्ही पॅनेलमध्ये उमेदवार कोण असतील याविषयीची उत्सुकता आहे. ठराव प्रक्रियेतच डोंगळे, विश्‍वास पाटील व चुयेकर यांनी स्वतंत्र ठराव दाखल करून आपली दिशा स्पष्ट केली होती. त्यात राजेश पाटील व सरूडकर यांचाही निर्णय विरोधी आघाडीसोबत जाण्याचा निश्‍चित आहे. या पार्श्‍वभूमीवर आज झालेल्या बैठकीला महत्त्व आहे. 

गेल्या महिनाभरापासून संचालकांचा तालुकानिहाय दौरा सुरू आहे. या दौऱ्याचा आढावा नेत्यांनी घेतला. संचालकांचा एकत्रित असा करवीरचा दौरा शिल्लक आहे, येत्या दोन दिवसांत तोही दौरा पूर्ण करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या आहेत. त्यानंतर त्या त्या तालुक्‍यातील संचालकांनी आपल्या तालुक्‍यातील ठरावदारांची वैयक्तीक भेट घेण्याचे आदेश नेत्यांनी बैठकीत दिले. 

बैठकीला अध्यक्ष रवींद्र आपटे, ज्येष्ठ संचालक अरूण नरके, रणजितसिंह पाटील, विश्‍वास जाधव, धैर्यशील देसाई, वसंत खाडे, पी. डी. धुंदरे, सत्यजित पाटील, उदय पाटील, दिपक पाटील, बाबा देसाई आदी उपस्थित होते. 

त्या जागांवर पाठिंबा देणाऱ्या नेत्यांना संधी मिळणार 

या बैठकीच्या निमित्ताने सत्तारूढ गटाच्या नेत्यांनी आपल्या गटाची ताकद आजमावली. पाच विद्यमान संचालक जरी गैरहजर राहिले असले तरी त्यांच्या जागेवर पाठिंबा देणाऱ्या इतर नेत्यांना त्या जागा देता येतील, अशीही भूमिका या बैठकीत घेतल्याचे समजते. यावर प्रत्यक्ष कार्यक्रम लागल्यानंतर पुन्हा चर्चा करण्याचे ठरले. 

संचालकांनी केलेल्या दौऱ्याचा आढावा घेतला 

सुमारे दोन तास चालेल्या या बैठकीतून बाहेर आल्यानंतर पत्रकारांनी पी. एन. पाटील यांना विचारले असता ते म्हणाले,"ही प्राथमिक बैठक होती. त्यात गेल्या महिनाभर तालुकानिहाय संचालकांनी केलेल्या दौऱ्याचा आढावा घेण्यात आला. यापेक्षा अन्य कोणतीही चर्चा झाली नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT