Grampanchayat Member Kidnapped before Sarpanch Election in Dhule
Grampanchayat Member Kidnapped before Sarpanch Election in Dhule 
मुख्य बातम्या मोबाईल

सरपंच निवडणुकीच्या आदल्या दिवशी ग्रामपंचायत सदस्याचे अपहरण

सरकारनामा ब्युरो

शिरपूर (जि. धुळे)  : मतदान करण्यापूर्वी सदस्यांचे अपहरण करण्याच्या घटना आपण मोठ्या पडद्यावर किंवा सिरीयल मध्ये आत्ता पर्यंत बघत आलो आहोत. परंतु सरपंच पदासाठी ग्रामपंचायत सदस्याकडून मतदान होऊ नये यासाठी शिरपूर तालुक्यातील साकवद ग्रामपंचायतीमध्ये सदस्य पदावर निवडून आलेल्या विजयी उमेदवाराचे मतदानाच्या एक दिवस आधीच भर बाजारातून अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

अशा पद्धतीने जर लोकशाहीची व संविधानाची मुस्कटदाबी करून सरपंच पदाची निवड झाली असेल, तर निवडणूक आयोगाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन ही निवडणूक प्रक्रिया रद्द करावी अशी मागणी अपहरण झालेल्या ग्रामपंचायत सदस्य कडून केली जात आहे.

साकवद सरपंच पदासाठी मतदान करू नये म्हणून निवडणुकीच्या एक दिवस आधी नवनिर्वाचित सदस्याचे शिरपूरच्या बाजारातून भरदिवसा अपहरण करण्यात आले. तिसऱ्या दिवशी स्वत:ची सुटका करून आल्यानंतर या सदस्याने पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. 

साकवद ग्रामपंचायतीत दोन्ही पॅनलचे प्रत्येकी ३ सदस्य निवडून आल्याने सरपंच आणि उपसरपंच पद कोणाकडे जाईल, अशी संभ्रमावस्था आहे.१२ फेब्रुवारी रोजी सरपंचपदाची निवडणूक होती. १४ फेब्रुवारीला घरी गोंधळाचा कार्यक्रम असल्याने ११ फेब्रुवारीला दत्तू धना भील हे पत्नी तोलाबाई, भाचा आणि चुलत भाऊ महादू भीलसह बाजार करण्यासाठी शिरपूरला आले. 

दुपारी चारपर्यंत बाजार झाल्यावर अरुणावती नदीवरील खंडेराव मंदिराजवळ चारचाकीतून आलेल्या ३ अनोळखी संशयितांनी दत्तू भील यांना उचलून गाडीत बसवले. नंतर वेगाने गाडी खर्देमार्गे मुंबई आग्रा हायवेवरून पुन्हा मांडळ शिवारात असलेल्या रिक्रिएशन गार्डनमागे गाडी थांबवली. संशयितांच्या बोलण्यावरून भील यांना आपले अपहरण झाल्याचे समजले.

अपहरणकर्त्यांनी यादरम्यान १२ फेब्रुवारीला ६ वाजता भील यांना धुळ्यातील एका लॉजवर नेण्यात आले. सकाळी पुन्हा ११ वाजता त्यांना गाडीत बसवून मालेगावला नेण्यात आले.तिथून पुन्हा धुळ्यामार्गे शिरपूर येथे सायंकाळी ५ वाजता शिरपूर फाट्यावर गाडी थांबवली. काही वेळानंतर तेथून खंबाळे गावात घेऊन आले. तिथे विडी घेण्याच्या बहाण्याने भील यांनी नजर चुकवून तेथून पळ काढला. खंबाळेच्या जंगलातून भील  आंबे गावात पोहोचले. तेथे आतेभाऊ रोहिदास भील याला सर्व हकिगत सांगून त्याच्या मोबाइलवरून पत्नी तोलाबाईला सुरक्षित असल्याचे कळवले. 

अपहरण झाल्यानंतर तोलाबाईने पोलिसांत तक्रार देण्याचा प्रयत्न केला. परतल्यानंतर लागलीच दत्तू भील यांनी पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी दत्तू भील यांच्या फिर्यादीनुसार,संशयित भूषण मोरे (शिरपूर) लखन भिल  (रा.रामसिंगनगर, शिरपूर), सुनील उर्फ भिवसन भील (रा. तांडे, शिरपूर) आणि अनोळखी  विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अशा पद्धतीने जर लोकशाहीची व संविधानाची मुस्कटदाबी करून सरपंच पदाची निवड झाली असेल, तर निवडणूक आयोगाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन ही निवडणूक प्रक्रिया तात्काळ थांबवून ही निवडणूक रद्द करावी अशी मागणी अपहरण झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांकडून केली जात आहे.
Edited By - Amit Golwalkar
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT