Gujrat municipal corporation election result ncp win one seat
Gujrat municipal corporation election result ncp win one seat 
मुख्य बातम्या मोबाईल

काँग्रेसच्या चिन्हावर राष्ट्रवादीच्या एकमेव उमेदवाराचा विजय...

सरकारनामा ब्युरो

मुंबई : गुजरातमधील सहा महापालिका निवडणुकांचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. भाजपने सहाही महापालिकांत बहुमत मिळवले असून काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. सुरतमध्ये काँग्रेसला खातेही खोलता आले नाही. तर अहमदाबाद महापालिकेत केवळ २५ उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामध्ये गुजरातमधील राष्ट्रवादी काँग्रेसचा एक उमेदवारही विजयी झाला आहे. 

गुजरातमधील अहमदाबाद, सुरत, वडोदरा, राजकोट, जामनगर आणि भावनगर या महापालिकांच्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी झाली. भाजपने ५७६ पैकी ४८३ ठिकाणी विजय मिळविला आहे. तर काँग्रेसला जेमतेम ५५ जागा मिळाल्या आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नकुल सिंग तोमर यांनी अहमदाबाद मधील कुबेरनगर वॉर्डातून काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत ते विजयी झाले आहेत. खासदार सुप्रिया सुळे व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी ट्विट करून तोमर यांना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

सहाही महापालिकांमध्ये भाजपने मोठी विजय मिळविला आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी भाजपला अभुतपूर्व असेच यश मिळाले आहे. २०१५ च्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी उमेदवारांचा आकडा १५ टक्क्यांनी वाढला आहे. अहमदाबादमध्ये १९२ पैकी १५९, राजकोटमध्ये ७२ पैकी ६८, जामनगरमध्ये ६४ पैकी ५०, भावनगरमध्ये ५२ पैकी ४४, वडोदरामध्ये ७६ पैकी ६९ तर सुरतमध्ये १२० पैकी ९३ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. 

काँग्रेसला सुरत महापालिकेत खातेही खोलता आले नाही. तर अहमदाबादमध्ये केवळ २५ जागा मिळाल्या. राजकोटमध्ये चार, जामनगरमध्ये ११, भावनगरमध्ये आठ आणि वडोदरामध्ये सात जागांवर काँग्रेसने विजय मिळविला आहे. आपने सुरत महापालिकेत २७ जागा जिंकून धक्कादायक निकाल नोंदविला. तर असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएमने अहमदाबाद महापालिकेत सात जागा जिंकल्या आहेत. या जागा पूर्वी काँग्रेसच्या ताब्यात होत्या. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT