Nashik HAL to Produce Twelve Sukhoi MKI 30
Nashik HAL to Produce Twelve Sukhoi MKI 30 
मुख्य बातम्या मोबाईल

 'एचएएल'ला मिळाले काम; लढाऊ 'सुखोई एमकेआय' विमाने तयार करण्याचा निर्णय

विक्रांत मते

नाशिक  : भारत व चीनमधील वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने सुखोई एमकेआय जातीची लढाऊ विमाने तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे काम नाशिकच्या 'एचएएल'ला देण्यात आले आहे. तब्बल बारा लढाऊ विमाने तयार केली जाणार आहेत. वर्षभर पुरेल इतके काम आल्याने एचएएलमध्ये समाधानाचे वातावरण आहे. एक लढाऊ विमान तयार करण्यासाठी सुमारे ९०० कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याने 'एचएएल'च्या माध्यमातून दहा हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आर्थिक उलाढाल यानिमित्ताने होईल.

कोव्हीड- १९ विकाराने संपुर्ण जग व्यापल्याने त्यातून देशा-देशांमध्ये तणाव निर्माण होत आहे. चीनमधून कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव झाल्याचा आरोप झाला. त्यानंतर जगभरातील सर्वच देशांची चीनवर वक्रदृष्टी पडली. चीनने आक्रमकपणा दाखवत सीमांवरील देशांशी पंगा घेतला. आशिया खंडात चीनचा सर्वात मोठा स्पर्धक असलेल्या भारताच्या सीमेवर गेल्या महिन्यात गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये चकमकी झाल्या. त्यात भारताचे काही सैनिक शहीद झाले. त्यानंतर आता भारतानेदेखील चीनला जशास तसे उत्तर देण्यासाठी युद्धसज्जता करण्यास सुरवात केली आहे. गेल्या आठवड्यात संरक्षण मंत्रालयाने रशियासोबत करार करत ३३ मिग- २९ विमाने आणि १२ सुखोई एमकेआय लढाऊ विमानांचे तंत्रज्ञान खरेदीचा करार केला. सुखोई एमकेआय लढाऊ विमाने नाशिकच्या एचएएलमध्ये तयार करण्याचा निर्णय संरक्षण मुल्यमापन समितीने घेतला आहे.

वर्षभराची चिंता मिटली
'एचएएल' ने आतापर्यंत सुखोई-३० एमकेआय जातीची २२१ विमाने बनवली आहेत. एक लढाऊ विमान हवाई दलाला मार्चमध्ये हस्तांतरीत केले जाणार होते. परंतू, लॉकडाऊनमुळे शक्‍य झाले नाही. लवकरच हे तयार लढाऊ विमान हस्तांतरीत केले जाईल. शेवटच्या विमानाची डिलव्हरी झाल्यानंतर एचएएल कामगारांकडे काम नसल्याने चिंतेचे वातावरण होते. मात्र, आता नवीन १२ लढाऊ विमानांचे कंत्राट मिळाल्याने किमान वर्षभर कामाची चिंता मिटली आहे.

एचएएलमध्ये ३५०० कामगार व १५०० अधिकारी आहेत. विमानांचे काम संपल्याने पुढे काय याची चिंता होती. परंतू, आता सुखोई एमकेआय विमानांचे कंत्राट मिळाले आहे, असे एचएएल कामगार संघटनेचे सरचिटणीस सचीन ढोमसे यांनी सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT