मुख्य बातम्या मोबाईल

मुस्लिमांसाठी हॉटेलांत "हलाल'चे फलक लावा

सरकारनामा ब्युरो

मुंबई :  "हलाल' पद्धतीचे मांसाहारी खाद्यपदार्थ हॉटेलमध्ये असल्याचे फलक लावावेत, अशी मागणी समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे केली आहे. 

 मुस्लिमधर्मीयांमध्ये "हलाल' पद्धतीचा अवलंब करून कत्तल केलेल्या प्राण्यांच्या मांसापासून बनवलेले पदार्थ सेवन केले जातात. असे पदार्थ सर्व हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये उपलब्ध नसतात. 

या मागणीला राजकीय पक्ष आणि धार्मिक संस्थांकडून विरोध होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

मुंबईतील कोणत्या नागरिकांनी मांसाहार करावा किंवा शाकाहार करावा, काय खावे किंवा काय खाऊ नये, कोणत्या हॉटेलचालकाने "हलाल' खाद्यपदार्थांची विक्री करावी किंवा करू नये याला माझा आक्षेप नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 

इस्लाममधील तत्त्वांनुसार विशिष्ट पद्धतीने प्राण्यांची कत्तल केली जाते. त्याला "हलाल' असे म्हटले जाते. "हलाल' पद्धतीने कत्तल केलेल्या प्राण्यांच्या मांसाचे सेवन करणे, हे मुस्लिमांसाठी अनिर्वाय आहे.

परंतु, मुंबईतील अनेक हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये "हलाल' पद्धतीचा अवलंब करून मांसाहारी खाद्यपदार्थ तयार केले आहेत किंवा नाहीत, याची शंका मुस्लिमांना असते. त्यामुळे अनेक वेळा मुस्लिम नागरिक हॉटेलमध्ये जाऊन मांसाहारी पदार्थ खाण्याचे टाळतात, असे रईस शेख म्हणाले. 

अन्य देशांत पद्धत 
आंतरराष्ट्रीय स्तरावर हॉटेलात "हलाल' पद्धतीचे मांस असल्याचे फलक लावले जातात. त्याच धर्तीवर महापालिका आणि राज्य सरकारच्या आस्थापनेवरील हॉटेलांत मांसाहारी खाद्यपदार्थ "हलाल' पद्धतीचे आहेत किंवा नाहीत याची माहिती देणारे फलक लावावेत, अशी मागणी महापालिका आयुक्त, तसेच अन्न व औषधी द्रव्य प्रशासनाकडे केली आहे, अशी माहिती रईस शेख यांनी दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT