Hatharas Rape Victim Was supposed to get married in May
Hatharas Rape Victim Was supposed to get married in May 
मुख्य बातम्या मोबाईल

हाथरसची पीडिता मे महिन्यात बोहल्यावर चढली असती! साखरपुडाही झाला होता!

दिनेश गोगी

उल्हासनगर :  उत्तर प्रदेशमधील हाथरस पथरी गावातील ज्या पीडितेचा पाशवी बलात्काराने बळी घेतला. तिचा ८ महिन्यांपूर्वी साखरपुडा झाला होता. मे महिन्यात ती बोहल्यावर चढणार होती; पण लॉकडाऊनमुळे लग्न समारंभ लांबणीवर पडला. कोरोना नसता तर तिला ५  महिन्यांपूर्वीच लग्नात आशीर्वाद दिला असता, अशी माहिती पीडितेचे मोठे काका रोशनलाल वाल्मिकी व चुलतभाऊ बलबीर वाल्मिकी यांनी दिली आहे.

रोशनलाल हे गेल्या ३५ वर्षांपासून उल्हासनगरातील धोबीघाट परिसरात वास्तव्यास आहेत. हाथरस पथरी गावात वाल्मिकी परिवारातील केवळ चारच घरे आहेत. वाल्मिकी यांना तीन मुली आहेत. त्यापैकी एकीचे लग्न झालेले आहे. पीडिता ही सर्वात लहान होती. फेब्रुवारीमध्ये दिल्लीतील तरुणासोबत तिचा साखरपुडा झाला होता. मे मध्ये लग्न होणार होते; पण लॉकडाऊन सुरू झाल्याने ती बोहल्यावर चढू शकली नाही आणि आता तिला पाशवी अत्याचारामुळे जीव गमवावा लागल्याची खंत रोशनलाल यांनी व्यक्त केली. योगी सरकारवर आपला विश्‍वास नसल्याचेही त्यांनी सांगितले.

यापूर्वीही अतिप्रसंग
बलबीर वाल्मीकी यांनी सांगितले की, यापूर्वीही एकदा शेतात गाठून पीडितेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र तिच्या आईला तिच्या प्रतिकाराचा आवाज येताच अतिप्रसंग करणाऱ्यांनी पळ काढला होता. मात्र १४ सप्टेंबर रोजी तिला शेतात गाठून तिच्यावर पाशवी बलात्कार करण्यात आला. तिचे तोंड दाबून ठेवल्याने प्रतिकाराचा आवाज आला नाही. हे सांगताना बलबीर याचे डोळे पाणावले होते.

पोलिसांवरदेखील गुन्हा दाखल करा
रोशनलाल यांची शिवसेना उपशहर प्रमुख संदीप गायकवाड यांनी आज भेट घेतली. गायकवाड म्हणाले, सुशांतसिंग प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरू आहे. त्यापेक्षाही ही महाभयंकर घटना आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी. बलात्कार करुन तिची हत्या करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी. त्याचप्रमाणे तिचा अत्यंविधी पेट्रोल टाकून घाई गडबडीत उरकणाऱ्या जिल्हा प्रशासन व पोलिसांच्या विरोधात कायदेशीर करवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी उपशहरप्रमुख संदीप गायकवाड यांनी केली आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT