Haveli Bazar Samiti : Before the notification, many dreamed of becoming administrators and directors
Haveli Bazar Samiti : Before the notification, many dreamed of becoming administrators and directors 
मुख्य बातम्या मोबाईल

हवेली बाजार समिती : नोटिफिकेशनपूर्वीच अनेकांना प्रशासक, संचालकपदाची स्वप्ने 

जनार्दन दांडगे

लोणी काळभोर (पुणे) : गुलटेकडी (पुणे) येथील विभागीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन होऊन मुळशी आणि हवेली तालुक्‍यासाठी स्वतंत्र बाजार समिती अस्तित्वात येणार आहेत. तसे संकेत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडून मिळाले आहेत.

गुलटेकडी बाजार समितीवर हवेलीचे वर्चस्व राहणार आहे. बाजार समितीवर सरकारनियुक्त प्रशासकीय पदाधिकारी व संचालक होण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना व कॉंग्रेस या तीनही पक्षांतील अनेक कार्यकर्त्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. अनेक जण वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन आपली वर्णी लागावी, या साठी धावपळ करीत आहेत. 

सहकार विभागाकडून बाजार समितीच्या विभाजनाबाबत अधिकृतरित्या घोषणा होण्यापूर्वीच महाविकास आघाडीतील तीनही पक्षातील बड्या नेत्यांसह, गावपातळीवरील कार्यकर्त्यांनी प्रशासकीय अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक होण्यासाठी आपापल्या नेत्यांकडे फिल्डींग लावण्यास सुरुवात केली आहे. अनेक जण तर बाजार समितीचे संचालक झालोच, या अविर्भावात फिरत आहेत. 

गुलटेकडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यवहारात अनियमितता असल्याचे कारण पुढे करत 16 वर्षांपूर्वी तत्कालीन राज्य सरकारने बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती केली होती. त्यानंतर काही वर्षांचा अपवाद वगळता, बाजार समितीवर प्रशासक राहिला आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस सरकारने तीन वर्षांपूर्वी हवेली व मुळशी बाजार समित्या एकत्रित करून विभागीय बाजार समिती बनविण्यात आली होती. या बाजार समितीवर सत्ताधारी पक्षाच्या विचारांच्या नेत्यांना प्रशासकीय संचालक मंडळात स्थान देण्यात आले होते. 

कोरोनामुळे नोटिफिकेशन लांबले 

न्यायालयाच्या आदेशानुसार बाजार समितीच्या निवडणुकीचे वारे वाहत असतानाच साधारणपणे सहा महिन्यांपूर्वी राज्यात सत्ता बदल झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. सत्ताधारी पक्षातील आमदार अशोक पवार व संग्राम थोपटे यांनी पुणे विभागीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन करावे आणि पूर्वीप्रमाणे हवेली व मुळशी बाजार समित्यांचे अस्तित्व कायम ठेवण्याची आग्रही मागणी केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यात लक्ष घातले. त्यामुळे महिनाभरापूर्वी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी बाजार समितीच्या विभाजनाबाबत तोंडी संकेत दिले होते. विभाजनाबाबतचे संकेत मिळून महिना उलटून गेला तरीही, कोरोनामुळे विभाजनाबाबतचे नोटिफिकेशन निघू शकलेले नाही. 

प्रशासक हटविण्याची मागणी 

दरम्यान, नोटीफिकेशनची प्रक्रिया रखडलेली असली तरी माजी सभापती प्रकाश म्हस्के व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुरेश घुले यांनी बाजार समितीचे विद्यमान प्रशासक बाळासाहेब देशमुख यांना हटविण्याची मागणी नुकतीच सरकारकडे केली होती. यामुळे अनेकांना विद्यमान प्रशासक हटणार आणि आपल्याला संधी मिळणार, अशी स्वप्ने पडू लागली आहेत. 

गावोगावी पुढाऱ्यांच्या फुशारक्‍या 

पूर्व हवेलीतील अनेक स्वयंघोषित नेत्यांना मोठ्या प्रमाणात पडू लागली आहेत. अनेक मंडळी आमदार अशोक पवार यांच्या जवळचा व मर्जीतील आहे, हे दाखवण्यासाठी धडपडत आहेत. अनेक गावांत पुढारी आपण प्रशासकीय संचालक होणार, अशा फुशारक्‍या मारत आहेत. काहींनी प्रशासक मंडळात सहभागी होण्यासाठी वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. वरीष्ठ नेत्यांनी आपल्याला शब्द दिल्याचे ते सांगत आहेत. 

गुलटेकडी (पुणे) येथील विभागीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन होऊन हवेली व मुळशी या दोन स्वतंत्र बाजार समित्या अस्तित्वात येणार आहेत, ही बाब खरी आहे. याबाबतचे संकेत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले आहेत. मात्र, कोरोनामुळे अद्याप आदेश निघू शकलेला नाही. यामुळे बाजार समितीवर सरकार नियुक्त प्रशासक येणार ही अफवाच आहे. हवेली बाजार समितीचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण झाल्यानंतरच पुढील निर्णय घेतले जातील. स्वतंत्र बाजार समितीचे नोटीफिकेशन आले नसताना, त्याबद्दल बोलणे उचित ठरणार नाही. 
-ऍड. अशोक पवार, आमदार शिरूर-हवेली 

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT