NCP-jayant-Patil
NCP-jayant-Patil 
मुख्य बातम्या मोबाईल

माढा लोकसभेच्या उमेदवाराचे नाव आत्ताच कसे जाहीर करू?  : जयंत पाटील 

सुनील राऊत

नातेपुते: " राज्यात व देशात मोदींच्या थापेबाजीला लोक कंटाळले आहेत. एक फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पात "छप्पर फाडके' अशा खोट्या घोषणा दिल्या तरी जनता त्यावर विश्‍वास ठेवणार नाही. लोकसभेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी येत्या आठ दिवसांत निश्‍चितपणे जाहीर करू," असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या परिवर्तन यात्रेनिमित्त सोलापूर जिल्हा आगमनाच्या वेळी नातेपुते येथील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रणवीरसिंह देशमुख यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सातारा जिल्ह्यातून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, प्रदेश सरचिटणीस मोहन भोसले यांचे आगमन झाले.

नातेपुते येथे जिल्ह्याच्या वतीने माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, माजी सरपंच अमरशील देशमुख, तात्यासाहेब देशमुख, मार्केट कमिटीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, डॉ. एम. पी. मोरे, ऍड. डी. एन. काळे यांनी स्वागत केले.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "संपूर्ण राज्यातील दौरे पूर्ण होत आले आहेत. कोणत्याही मतदारसंघात उमेदवाराच्या नावाची घोषणा केलेली नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे लोकसभेसाठी उमेदवारी मागण्यासाठी गर्दी आहे. विदर्भातील बुलडाणा येथे प्रचंड उत्साह दिसून आला. जळगावमध्येही चांगले वातावरण आहे. औरंगाबादमध्ये वातावरण फार अनुकूल आहे."

माढा मतदार संघातून कोणाला उमेदवारी देणार असे पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, " अद्याप सुप्रिया सुळेंचीही उमेदवारीची घोषणा केलेली  नाही. त्यामुळे माढा लोकसभेच्या उमेदवाराचे नाव कसे जाहीर करू? येत्या आठ दिवसांत शरद पवार, छगन भुजबळ, अजित पवार यांच्यासोबत चर्चा करून पहिली यादी निश्‍चितपणे जाहीर करू. त्यामुळे उमेदवारास प्रचारास भरपूर वेळ मिळेल.''

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभाराला जनता कंटाळली आहे. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोज नवनवीन घोषणा सुरू आहेत. 22 लाख कोटींची गुंतवणूक दोन वर्षांत कुठेही दिसून आलेली नाही. युवा पिढी सरकारच्या विरोधात गेली आहे'', असे प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT