Nitin Gadkary Asks Question About Outside State Labors
Nitin Gadkary Asks Question About Outside State Labors 
मुख्य बातम्या मोबाईल

परप्रांतीय गावी जाऊन काय खाणार : नितीन गडकरी

सरकारनामा ब्युरो

मुंबई  : मुंबईसह अन्य शहरांतील परप्रांतीय मजूर गावाकडे गेले तर काय खाणार, असा प्रश्‍न उपस्थित करत लॉकडाऊन संपल्यावर त्यांची या ठिकाणीच रोजीरोटी सुरू होईल, यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक असल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

कोरोनाचा विळखा आणि सुरू असणारे देशव्यापी लॉकडाऊन या सर्व परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परप्रांतीय मजुरांसाठी विशेष ट्रेन सोडण्याची मागणी केली आहे. यावर बोलताना गडकरी म्हणाले, "परप्रांतीय त्यांच्या मूळ गावी परतल्यानंतर त्यांच्या हाताशी रोजगार कुठे आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. परप्रांतीयांना गावाकडे पाठवून उपयोग नाही. उलटपक्षी त्यांना इथेच थांबवून हळूहळू त्यांच्या हाती उद्योग देण्याचा विचार होऊ शकतो,"

राज्यात अडकललेल्या जवळपास सहा लाख परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी परत पाठवण्यासाठी केंद्र सरकारने विशेष ट्रेन सोडावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती. ज्यावर भूमिका मांडताना गडकरी म्हणाले, "मी त्यांचा विरोध करत नाही; मात्र ही मंडळी गावात गेली तर त्यांना रोजगार आहे कुठे? या मंडळींना त्या ठिकाणी रोजगार न मिळाल्यामुळेच ते मुंबई आणि पुण्यामध्ये आले आहेत. त्यामुळे आता त्यांना रोजगार मिळणे हा मुद्दा महत्त्वाचा आहे', 

प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर द्यावा

गावाकडे गेल्यावर या मंडळींकडे राहण्यास घर असेल, पण त्यांना रोजगाराअभावी खायला काय मिळणार, असा प्रश्‍न त्यांनी अधोरेखित केला. मजुरांना गावी पाठवण्यापेक्षा इथे हळूहळू कामे सुरू करणे आणि त्यांचे प्रश्‍न सोडवण्यावर भर दिला गेला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. मेट्रो, राष्ट्रीय महामार्ग अशी अनेक कामे आता सुरू होतील. त्यामुळे यातील बऱ्याच मजुरांना काम मिळू शकेल आणि कारखान्यांच्या मालकांनी, उद्योजकांनी या मजुरांच्या राहण्याच्या, खाण्याच्या गरजांवर जबाबदारीने लक्ष देत कोरोनाच्या दृष्टीने आखलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनाही अमलात आणण्यावर भर द्यावा असा सल्ला गडकरी यांनी दिला.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT