IAS dheeraj kumar appointed as Maharashtra agriculture commissioner
IAS dheeraj kumar appointed as Maharashtra agriculture commissioner 
मुख्य बातम्या मोबाईल

राज्याच्या नव्या कृषी आयुक्तांना उत्तर प्रदेशच्या पणन संचालकपदाचाही अनुभव 

सरकारनामा ब्युरो

पुणे : कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची पीएमआरडीए मध्ये बदली झाल्यानंतर त्यांच्याजागी धीरज कुमार यांची नियुक्त करण्यात आली आहे. धीरज कुमार हे 2005 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून ते 2018 पासून उत्तर प्रदेशमध्ये प्रतिनियुक्तीवर होते.

धीरजकुमार हे अभियांत्रिकी क्षेत्रातील उच्च शिक्षित आहेत. २०१२ ते २०१५ या दरम्यान ते नांदेडचे जिल्हाधिकारी होते. जुलै २०१६ ते मे २०१७ पुण्यात ते शिक्षण आयुक्त म्हणून कार्यरत होते. २०१८ पासून ते प्रतिनियुक्तीवर उत्तर प्रदेशला गेले होते. तिथे सरकारच्या सामाजिक विकास विभागात विशेष सचिव म्हणून होते. पणन विभागाच्या संचालकपदाची जबाबदारीही त्यांच्याकडे होती. 

नियुक्तीनंतर धीरज कुमार म्हणाले,‘‘राज्याचे मुख्यमंत्री, कृषिमंत्री आणि सचिव यांचा कृषी विकासाचा जो अजेंडा आहे, त्यानुसार कामास प्राधान्य असेल. बाजार समित्यांमधील डिजिटलाझेशन, शेतकरी कंपन्यांना अधिक प्राधान्य देऊन मोठ्या खरेदीदारांपर्यंत पर्यंत त्यांना पोचविणे, कृषी क्षेत्रात माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे, त्यांना शेतकऱ्यांपर्यंत पोचविणे, बी-बियाणेपासून मार्केटिंग पर्यंत सर्व सुविधा एकाच व्यासपीठावर कसे आणता येईल, याकडे जास्त लक्ष देणार
आहे. ’’ 
 
स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील खदखद कायम

पुणे : लॉकडाऊनच्या काळातील वाढीव घरगुती वीज बिले माफ करण्यात यावीत, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीन महावितरणच्या विरोधात सोमवारी राज्यभर आंदोलन केले गेले. कार्यकर्ते एकत्रित वीजबिलाची होळी करत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार हे आंदोलनापासून दूर राहिले. त्यांच्या मतदारसंघात आंदोलन झाले नाही.

कोल्हापूर येथील आंदोलनात राजू शेट्टी यांच्या सोबत शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते एन डी पाटील सहभागी होते. यावेळी विजबिलाची होळी करण्यात आली.  स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यभर आंदोलन करत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार हे मात्र या आंदोलनापासून दूर राहिले.  

राजू शेट्टी यांनी सर्वपक्षियांना सहभागी होण्याचे आवाहन केले होते. मात्र त्यांच्याच पक्षाचे आमदार या आंदोलनापासून दूर राहिले. महिनाभरापुर्वी भुयार हे स्वाभिमानीत नाराज असल्याचे स्पष्ट झाले. "स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वरिष्ठ नेत्यांनी मला मंत्रिपद मिळू दिले नाही' असा आरोप त्यांनी केलेला आहे. त्यावर भुयार यांची समजूत काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र ती समजूत काढण्यात संघटनेला अजून यश आल्याचे दिसत नाही. या धुसफुसीतून भुयार आंदोलनापासून दूर राहिल्याचे बोलले जात आहे.  

Edited by swarup jankar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT