Babul supriyo
Babul supriyo 
मुख्य बातम्या मोबाईल

`माझे मंत्रीपद का गेले, याचे उत्तर मिळाले तर मलाही शांती मिळेल!`

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली : बाबूल मोरा, नैहर छूटो जाय, या जगप्रसिद्ध भैरवीतील व्यथांना शब्दरूप देत, चित्रपट पार्श्वगायनाकडून राजकारणात आलेले माजी केंद्रीय मंत्री व भाजप खासदार बाबूल सुप्रियो यांनी आज नाट्यमयरीत्या राजकारण संन्यास घेण्याची घोषणा केली.

पश्चिम बंगालमधील आसनसोल येथून सलग दोनदा खासदार झालेले सुप्रियो यांनी खासदारकी सोडण्याचीही घोषणा कली आहे. दिल्लीतील आपला बंगला आपण महिनाभराच्या आत सोडू असे त्यांनी जाहीर केले. 

नरेंद्र मोदी मंत्रिमंडळातून पंधरा दिवसांपूर्वी राजीनामा द्यावा लागल्याने व्यथित झालेले सुप्रियो यांनी एका भावनिक फेसूबुक पोस्टद्वारे राजीनाम्याची घोषणा केली. मात्र आपण तृणमूल कॉंग्रेस, कॉंग्रेस, डावे पक्ष यापैकी कोणत्याही राजकीय पक्षात जाणार नाही असेही त्यांनी तूर्तास स्पष्ट केले आहे.

१९९२ मध्ये मोठ्या पगाराची नोकरी सोडून मुंबईत जातानाही आपण पुढे काय, याचा विचार केला नव्हता व आजही तो केलेला नाही असे सांगून सुप्रियो यांनी म्हटले की राजकारण सोडण्याचा आपला विचार आपण अमित शहा व जे. पी. नड्डा यांच्या कानावरही घातला आहे. त्यांनी मला प्रेरित केले व त्यांचे प्रेम मी विसरू शकणार नाही. आसनसोलच्या जनतेच्या प्रेमाच्या ऋणात तर आपण आजन्म राहू. राज्यातील भाजप नेतृत्वाबरोबरच्या मतभेदांचाही त्यांनी उल्लेख केला आहे. ‘आपले केंद्रीय मंत्रालय गेले याचे आपल्या राजकारण सोडण्याच्या निर्णयाशी काही घेणे देणे आहे का? तर जरूर आहे. आपल्याला मंत्रिपद का सोडावे लागले याचे उत्तर मिळाले तर मलाही शांती मिळेल' असे सुप्रियो यांनी भाजप नेतृत्वाला सुनावले आहे.

२०१४ व २०१९ मधील बंगाल भाजपमध्ये मोठा फरक असल्याचे सांगून सुप्रियो यांनी म्हटले आहे की तेव्हा मी भाजपच्या तिकीटावरून जिंकलेला राज्यातील एकमेव खासदार होतो. आज तेथेच भाजप मुख्य विरोधी पक्ष आहे. मात्र राजकारणाची पातळी खालावली आहे त्याचाही विचार वरिष्ठ पातळीवरून व्हायला हवा असे सुप्रियो यांनी म्हटले आहे.

आपल्या निरोपाच्या फेसबुक पोस्टच्या अखेरीस सुप्रियो यांनी पुढील कविता उद्धृत केली आहे -

मैं तो जा रहा हूँ..
हाँ, कुछ शब्द रह गए हैं..
शायद कभी कहेंगे..
आज मैं वहां नहीं हूँ या कह रहा हूँ..
मैं तो जा रहा हूँ..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT