Income Tax Collection from Maharashtra Reduced
Income Tax Collection from Maharashtra Reduced 
मुख्य बातम्या मोबाईल

'प्राप्तीकरा'त दहा हजार कोटींची घट! सोने व्यापारी, डॉक्‍टर कारवाईच्या रडारवर 

तात्या लांडगे

सोलापूर : अडीच लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या उद्योजक, व्यावसायिकांना प्राप्तीकर भरणे अनिवार्य असून 2019- 20 च्या उद्दिष्टानुसार पुणे, मुंबई व नागपूर विभागातून सुमारे 40 हजार कोटींचा प्राप्तीकर वसूल होणे अपेक्षित आहे. मात्र, जागतिक मंदीमुळे राज्यातील उद्योग अडचणीत आल्याने यंदा प्राप्तीकरात दहा हजार कोटींपर्यंत घट होण्याची शक्‍यता अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केली आहे. वास्तविक पाहता दरवर्षी प्राप्तीकरणात 10 ते 20 टक्‍क्‍यांनी वाढ होणे अपेक्षित असतानाही मागील दोन वर्षांपासून प्राप्तीकराचे उद्दिष्टही पूर्ण झालेले नाही.

शासनाने दिलेले वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्राप्तीकर विभागाने स्वतंत्र पथकांची नियुक्‍ती केली असून सोने व्यापारी, डॉक्‍टर, कापड उद्योजकांसह बांधकाम व्यावसायिकांच्या उत्पन्नावर लक्ष ठेवले जात आहे. संशयास्पद खातेदारांच्या मालमत्ता अन्‌ उत्पन्नाची पडताळणी केली जात असून अचानक छापे टाकले जात आहेत. मागच्या वर्षी प्राप्तीकर न भरलेल्या अथवा कर चुकविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात असून काहीजणांची बॅंक खाती सील करण्यात आली आहेत. 

दरम्यान, राज्यातील वाढती बेरोजगारी, दुष्काळासह अन्य नैसर्गिक आपत्तींमुळे व्यवसायात झालेली घट, प्राप्तीकराचे उद्दिष्टपूर्तीस अडथळा ठरल्याचे अधिकारी सांगत आहेत. सोलापूर जिल्ह्यात प्राप्तीकर भरणारे एक लाख 18 हजार खातेदार असून त्यांच्याकडून सुमारे 530 कोटींचा प्राप्तीकर वसूल होणे अपेक्षित आहे. मार्चएण्डला आता काही दिवस शिल्लक असतानाही 300 कोटींचीही वसुली झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, एक हजार 800 करदात्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. तर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मार्चनंतर व्याजासह कर भरणाऱ्यांना मार्चपूर्वी कर भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

प्राप्तीकर चुकविणाऱ्या व्यावसायिकांवर जप्तीची कारवाई केली जात असून त्यांची बॅंक खाती सील केली जात आहेत. त्यासाठी स्वतंत्र पथकांची नियुक्‍ती करण्यात आली असून अचानक धाडीही टाकल्या जात आहेत. प्राप्तीकरदात्यांनी 31 मार्चपर्यंत त्यांच्याकडील कराची थकीत रक्‍कम भरणे अनिवार्य आहे. जागतिक मंदीमुळे प्राप्तीकरात घट झाली आहे. - बी. वाय. चव्हाण, अतिरिक्‍त आयुक्‍त, आयकर, पुणे

सोलापूरची स्थिती

प्राप्तीकर भरणारे व्यावसायिक - 1.18 लाख
करवसुलीचे उद्दिष्ट - 530 कोटी
संशयास्पद खात्यांची पडताळणी - 1,800

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT