Interest on BEST Bills to be Waived
Interest on BEST Bills to be Waived 
मुख्य बातम्या मोबाईल

'बेस्ट' च्या वीजबिलांवरील व्याज माफ होणार; राष्ट्रवादीच्या सरचिटणीसांची शिष्टाई

सरकारनामा ब्युरो

मुंबई : लॉकडाऊन काळात बेस्ट च्या वीज ग्राहकांना आलेल्या मोठ्या बिलांच्या रकमेवरील व्याज माफ करण्यासंदर्भात बेस्ट समितीचे अध्यक्ष प्रवीण शिंदे यांनी आदेश दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बबन कनावजे यांनी यासंदर्भात केलेल्या शिष्टाईमुळे लौकरच ग्राहकांना मोठाच दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

लॉकडाऊनच्या काळात मीटररीडींग घेणे बंद असल्याने त्या महिन्यांची एकत्रित बिले वीज ग्राहकांना जून महिन्यानंतर आली होती. जादा वापर झाल्याने तसेच तीन चार महिन्यांची एकत्रित बिले मोठ्या रकमेची आल्याने ग्राहकांना धक्का बसला होता. एवढे मोठे बिल एकरकमी भरणे सामान्य ग्राहकांना शक्य नसल्याने बेस्ट ने तीन हप्त्यांमध्ये रक्कम भरण्याची सवलत ग्राहकांना दिली होती.

त्यानुसार ग्राहकांनी पहिला हप्ता भरला, मात्र दुसरा हप्ता भरण्यास गेलेल्या ग्राहकांना त्या हप्त्याच्या रकमेवर व्याज आकारल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे तिसऱ्या शिल्लक हप्त्यावरही व्याज लावले जाईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे अनेक ग्राहकांनी ही बाब दक्षिण मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन नारकर यांच्या निदर्शनास आणली. त्यानुसार हा अन्याय दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बबन कनावजे यांनी बेस्ट समिती अध्यक्ष प्रविण शिंदे यांना विनंती केली.

त्यानुसार शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. मीटर रीडींग घेणे बंद असल्याने ग्राहकांना एकाच महिन्यात मोठी बिले आली. हा ग्राहकांचा दोष नव्हता, आता ग्राहक बिलांची सर्व रक्कम देतील, मात्र त्यांना त्या रकमेवर व्याज आकारू नये, ते व्याज माफ करावे, असे कनावजे यांनी बैठकीत सांगितले. विजबिले तीन हप्त्यांमध्ये भरण्याची सवलत बेस्ट ने दिली असल्याने त्यावर हा व्याजरुपी दंड आकारू नये, व्याज आकारणे हा अन्याय होईल, असेही ते म्हणाले. बेस्टचे मुख्य अभियंता (ग्राहक सेवा) राजेंद्र पाटसुते यांनी देखील याबाबत सकारात्मक भुमिका घेतली. बेस्ट समिती अध्यक्षांनी व्याजाची आकारणी न करण्याचे  आदेश दिले, असे कनावजे यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी सोशल मिडिया समन्वयक दिपक पारडीवाला, पक्षाचे शिवडी विधानसभा युवक अध्यक्ष विशाल कनावजे उपस्थित होते. 
Edited By - Amit Golwalkar
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT