पुणे : पराभव साजरा करण्यात गैर काय आहे? आणि तो साजरा करायला नशीब लागतं. विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव मी खिलाडूवृत्तीने घेतला. इतके दिवस मी घरात राहिले, तर का घरात आहे, असं बोलत होतो. आता बाहेर पडले तर पराभव साजरा करत आहे, असे म्हणतात, असा टोला भारतीय जनता पक्षाच्या नेत्या, माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना लगावला.
ऊस तोडणी कामगारांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी आज (ता. 27 ऑक्टोबर) ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत ऊस तोडणी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीसाठी एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक धनंजय मुंडे, पंकजा मुंडे एकत्र आले होते. त्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नावर पंकजा यांनी वरील उत्तर दिले.
अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी वर्षभराच्या कालावधीनंतर म्हणजेच विधानसभा निवडणुकीनंतर पंकजा मुंडे प्रथमच बीड जिल्ह्यात आल्या होत्या. त्यावर एका कार्यक्रमात बोलताना मंत्री धनंजय मुंडे यांनी टीका केली होती. काही लोक पराभवाची वर्षपूर्ती साजरी करायलाच जिल्ह्यात येतात, असा टोला त्यांनी पंकजा यांना लगावला होता. त्याला आज पंकजा यांनी सणसणीत उत्तर दिले.
त्या पार्श्वभूमीवर पंकजा म्हणाल्या की, पराभव साजरा करायचं नशीब कुणाला मिळतं. एखादी पराभूत व्यक्ती नांदेडपासून आठ जिल्ह्यांमध्ये स्वागत सत्कार घेतल्यांनंतर मोठा मेळावा होत असेल तर ही पुण्याईच म्हणावी लागेल.
या बैठकीत तुम्ही दोघे एकत्र आला होता. यापुढेही चांगलं बघायला भेटेल का? या प्रश्नावर पंकजा यांनी सांगितले की, असं चांगलं काही होणार नाही. कारण, आमच्या दोघांमध्ये चांगलं झालं तर आमच्या पक्षाला प्रॉब्लेम होईल.
जनतेच्या प्रश्नावर एकत्र असण्यात काही वावगं नाही, याचा अर्थ मागचं सगळं मिटलं, असा होत नाही. पण मी त्यांच्याबाबत कायम दिलदारी दाखवली आहे. त्यांना पुरस्कार मिळाला तेव्हा मी त्यांचे अभिनंदन केले. आजारी असताना विचारपूस केली, अशा गोष्टींमध्ये मी कधीही विसंवाद आणत नाही, असे त्यांनी नमूद केले.
"राज्यात सगळे म्हणतात की, मी नाराज आहे. पण, मी अजूनही तसं कधीच म्हटलेलं नाही. नाराजी असण्याचा काही विषयच नाही. मी पक्षात समाधानी आहे, असेही पंकजा या वेळी म्हणाल्या.
Edited By Vijay Dudhale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.