Priya Berde and Shakuntala Nagarkar will Join NCP
Priya Berde and Shakuntala Nagarkar will Join NCP 
मुख्य बातम्या मोबाईल

मी विधान परिषदेसाठी नाही तर कलाकारांच्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादीत प्रवेश करतेय : प्रिया बेर्डे

भरत पचंगे

शिक्रापूर  : विधान परिषदेत जाण्यासाठी मी राष्ट्रवादीत प्रवेश करीत नसून लॉकडाऊनच्या काळात पडद्यावरील व पडद्यामागील कलाकारांचे भीषण आयुष्य मी अनुभवत असल्याने या कलाकारांना न्याय देण्यासाठी मी राष्ट्रवादीचे व्यासपीठ निवडले आहे, असे अभिनेते स्व. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी प्रिया बेर्डे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना स्पष्ट केले. जेष्ठ नेते शरद पवार यांचे कलेवरचे प्रेम सर्वच कलाकारांना परिचित असताना खासदार सुप्रिया सुळेंच्या निमंत्रणामुळे माझ्यासह अनेक कलाकार आता राष्ट्रवादीत प्रवेश करीत असल्याचे त्यांनी सांगितले. 

मंगळवारी (दि.७) रोजी खासदार सुप्रिया सुळे व चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात अभिनेत्री प्रिया बेर्डे, सुहासिनी देशपांडे, अभिनेते सिध्देश्वर झाडबुके, विनोद खेडकर, डॉ.सुधीर निकम, अखिल भारतीय चित्रपता महामंडळाचे उपाध्यक्ष मिलींद अष्टेकर तसेच पारंपारिक लावणीतील जेष्ठ नृत्यांगणा शकुंतला नगरकर आदी एकत्रितपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. 

याच पार्श्वभूमीवर 'सरकारनामा'शी बोलताना प्रिया बेर्डे म्हणाल्या, ''लक्ष्मीकांत फौंडेशनचे काम मी राज्यभर जे करीत आहे त्याची सुरवात पुण्यात मी केलेली आहे. नवीन कलाकारांना व्यासपीठाच्या विषयावर मी त्या फौंडेशनच्या माध्यमातून खुप चांगले काम केले आहे. मात्र चित्रपटसृष्टीतील प्रश्नांना ठामपणे मांडावयाचे व्यासपिठ आम्हा कलाकारांना हवे होते. त्यासाठी कला या विषयाची उत्तम जाण असलेला संवेदनशील नेता आम्हाला हवा होता. त्यामुळे शरद पवार आम्हाला भावले. पर्यायाने आम्ही वरील सर्व कलाकारांनी एकत्रित पक्षप्रवेश करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. अर्थात प्रवेशाचे वेळी मी अधिक खुलासेवार बोलणार असून पक्षाकडून जी कुठली संघटनात्मक जबाबदारी माझ्यावर सोपविली जाईल ती मी तर पार पाडेन. शिवाय पक्षवाढ ही माझ्यासाठी प्राधान्यक्रम असेल,''

विधानपरिषद वगैरे काहीही डोक्यात नाही
राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या राष्ट्रवादीच्या वाट्याच्या चार जागांपैकी कलाकार कोट्यातील जागेसाठी काही दिवसांपूर्वी आनंद शिंदेही शरद पवार यांना भेटून गेले होते. पर्यायाने विधान परिषद डोक्यात ठेवूनच राष्ट्रवादीत प्रवेश करीत असल्याच्या चर्चेवर त्या म्हणाल्या, "माझे दिवंगत पती लक्ष्मीकांत बेर्डे व माझे माहेर अशा दोन्ही ठिकाणी कुठलीच राजकीय पार्श्वभूमी नसल्याने मला राजकारणात स्वारस्य नाही. मात्र, माझ्या पक्षप्रवेशाच्या वेळेबाबत अनेक तर्कवितर्क होत असल्याने मी स्पष्ट करु इच्छिते की, मी सुप्रियाताई आणि पवार साहेबांना भेटून जे बोलले ते केवळ चित्रपटसृष्टीतील पडद्यावरील आणि पडद्यामागील कलाकारांच्या प्रश्नाला पुढे ठेवून बोलले,''

"सध्या तर लॉकडाऊनच्या परिस्थितीत दोन्ही पध्दतीच्या कलाकारांचे हाल मी जे अनुभवते ते भीषण आहेत. या सर्वांना न्याय द्यायचा असेल तर आता कुठल्या कुठल्या पक्षाच्या व्यासपीठावर मला यायलाच हवे. हे सर्व मी साहेब आणि ताईंना बोलूनच पक्षप्रवेश करतेय. बाकी पुढे काय-काय माझ्या हातून चांगले होत राहील, त्यानुसार योग्य तो न्याय मिळेल एवढंच," असेही त्या म्हणाल्या.

न्याय मिळेल म्हणून राष्ट्रवादीचे व्यासपीठ
 सन १९९२ मध्ये अकलूज लावणी महोत्सवाच्या पहिल्या मानकरी असलेल्या शकुंतला नगरकर यांची भाची पौर्णिमा (बबली) व मयुरी नगरकर यांच्या पार्टीने मागील वर्षीचा शेवटच्या लावणी महोत्सवात बाजी मारली ती शकुंतलाबाईंच्या मार्गदर्शनाखाली. कै.ज्ञानोबा उत्पात लावणी पुरस्कार, शाहीर पठ्ठेबापूराव पुरस्कार, तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमीचा सन २००९ चा राष्ट्रीय पुरस्कार, अकलुज लावणी महोत्सवात दोन वेळा प्रथम क्रमांक तसेच सखी माझी लावणी, ढोलकीच्या तालावर, तुमच्यासाठी काही पण, संगीत बारी नावाच्या पारंपारीक लावणीचे कार्यक्रमाने त्या महाराष्ट्रभर पोहचलेल्या आहेत. 

सणसवाडीतील (ता.शिरूर) सुरेखाताई पवार यांच्या जय अंबीका सांस्कृतिक कलाकेंद्राच्या व्यवस्थापिका म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले आहे. सध्या वय साठ असले तरी त्यांचा पारंपारीक लावणीबाबतचा व्यासंग महाराष्ट्र जाणतो. तमाशा-लावणी कलाक्षेत्रातील कलाकार व साईड आर्टीस्टच्याबाबतीत असलेले अनेक प्रश्न त्यांच्या हयातीत त्यांनी पाहिले आहेत. त्यांनाच न्याय देण्यासाठी सक्षम नेता म्हणून पवार साहेबांकडे पाहून आपण राष्ट्रवादीत प्रवेश करीत असल्याचे त्यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT