Kalgitura in Shiv Sena-BJP from "Thane Unlock"
Kalgitura in Shiv Sena-BJP from "Thane Unlock" 
मुख्य बातम्या मोबाईल

भाजप म्हणतोय एकनाथ शिंदे आम्हाला डावलतात; तर सेना म्हणते भाजप दुटप्पी 

सरकारनामा ब्यूरो

ठाणे : ठाणे शहरात 16 ऑगस्टपासून सर्व दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेत उघडण्यास पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी परवानगी दिली आहे. एकीकडे कोरोनाच्या आपत्तीत राजकारण नको म्हणायचे अन्‌ श्रेय घेण्यासाठी आटापिटा करत विरोधकांना डावलायचे, अशी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची दुटप्पी भूमिका असल्याची खरमरीत टीका ठाण्यातील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ आमदार संजय केळकर व निरंजन डावखरे यांनी केली. 

दरम्यान, एखादी गोष्ट चुकीची झाली तर सत्ताधाऱ्यांवर खापर फोडायचे आणि चांगली झाली तर श्रेयवादासाठी आटापिटा करायचा, अशी भाजपची दुटप्पी भूमिका झाल्याची टीका महापौर नरेश म्हस्के यांनी केली आहे. त्यामुळे "ठाणे अनलॉकवरून' शिवसेना-भाजपमध्ये कलगीतुरा रंगल्याचे चित्र आहे. 

ठाणे शहरातील दुकाने उघडण्याचा निर्णय गुरुवारी (ता. 13 ऑगस्ट) दुपारी घेण्यात आला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला भाजपचे आमदार वा प्रतिनिधींना बोलाविण्यात आले नव्हते. तर शिवसेनेकडून दुकाने खुली करण्याबाबतचे श्रेय लाटले जात आहे.

या पार्श्वभूमीवर आमदार केळकर व डावखरे यांनी संताप व्यक्त केला आहे. मुंबईत 5 ऑगस्टनंतर सर्व दुकाने उघडण्याचा निर्णय झाला. मात्र, ठाण्यात दुकानांवर निर्बंध होते. या संदर्भात सर्वप्रथम भाजपने आर्थिक विवंचनेतून जात असलेल्या व्यापाऱ्यांची अडचण जाणून आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांना निवेदन दिल्याचे आमदार केळकर यांनी सांगितले. 

त्यावेळी अधिकृत भूमिका घेणारा भाजप हा एकमेव पक्ष होता. मात्र, सत्ताधारी शिवसेनेचे नेते तेव्हा गप्प होते. काल झालेल्या बैठकीनंतर दुकाने उघडण्याचे श्रेय घेण्यासाठी अहमहमिका लागली. कोरोनाच्या काळात राजकारण नको म्हणताना विरोधकांना विश्वासात न घेताच परस्पर बैठका घेण्याच्या पालकमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेनेच्या भूमिकेचा आम्ही निषेध करीत आहोत, असे आमदार केळकर व आमदार डावखरे यांनी सांगितले.

त्यावर भाजपने श्रेय मिळविण्यासारखे काम करावे आणि ठाण्यातील जनतेच्या विश्वासास पात्र ठरावे. फक्त पत्रक देऊन काम होत नाही, अशी प्रतिक्रिया महापौर नरेश म्हस्के यांनी दिली आहे. 

ठाणेकरांनी आम्हाला महापालिकेत एकहाती सत्ता दिली. म्हणून शहरातील हिताच्या दृष्टीकोनातून निर्णय घेण्याचा आमचा अधिकार आहे. व्यापारी प्रतिनिधींनी आमच्यापुढे त्यांची कैफियत मांडली आहे. त्यातून हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, टाळेबंदीसाठी भाजप आम्हाला दोष देत होते. पण, टाळेबंदीचा आणि पालिकेने घेतलेल्या काळजीमुळे रुग्ण संख्या कमी झाली आहे त्याचे श्रेय आम्हाला का देत नाहीत? 
- नरेश म्हस्के, महापौर, ठाणे 


Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT