Let there be a war with China :  Ramdas Athawale
Let there be a war with China : Ramdas Athawale 
मुख्य बातम्या मोबाईल

चीनशी एकदा आरपारचे युद्ध होऊद्याच

सरकारनामा ब्युरो

मुंबई  : चीन हा धोकेबाज देश आहे. धोका देऊन त्याने लडाखच्या गलवान खोऱ्यात भारतीय सैन्यावर हल्ला केला आहे. या भ्याड हल्ल्याचा आपण तीव्र निषेध करतो. चीनला धडा शिकविण्यासाठी एकदा चीनशी आरपारचे युद्ध लढले पाहिजे, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. 

दरम्यान, चीनची आर्थिक कोंडी करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. त्यासाठी भारतीय नागरिकांनी चीनी मालावर बहिष्कार टाकला पाहिजे. व्यापार उद्योग जगातला माझे आवाहन आहे की चीनमधून कोणत्याही प्रकारच्या सामग्रीची आयात करू नका. चीनमधून मालाच्या आयातीवर बंदी आणावी; निर्यातबंदी कारावी, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले यांनी केले आहे. 

लडाखच्या गलवान खोऱ्यात भारतीय सैन्यावर चीनी सैन्याने कपटबुद्धीने नियोजन करून धोका देत क्रूर हल्ला केला. हा हल्ला भ्याड हल्ला होता. चीनी हल्ला भारतीय सैनिकांनी परतवून लावत आपले शौर्य सिद्ध केले. या हल्ल्यात 20 भारतीय जवान हुतात्मा झाले. त्यांचे हौतात्म्य वाया जाणार नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. आम्हाला युद्ध नको, तर बुद्ध हवा आहे. पण चीन कायमच धोका देत युद्धाची खुमखुमी दाखवीत असेल तर एक दिवस आरपारचे युद्ध लढून चीनला कायमचा धडा शिकविण्यासाठी भारतीय सैन्य समर्थ आहे, असा इशारा आठवले यांनी दिला आहे. 

भाजपचे खासदार म्हणतात, 'अक्‍साई चीन परत घेण्याची हीच वेळ' 

नवी दिल्ली : "अक्‍साई चीन हा भारताचा भाग असून चीनच्या ताब्यातील तो भाग आता परत घेण्याची वेळ आली आहे. फक्त अक्‍साई चीनच नव्हे; तर गिलगिट आणि बाल्टिस्तान हाही लडाखचाच भाग आहे,'' असा दावा भारतीय जनता पक्षाचे लडाखचे खासदार जमयांग सेरिंग नामग्याल यांनी केला. 

खासदार जमयांग सेरिंग नामग्याल हे एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. ते म्हणतात की, "हा 1962 भारत नसून 2020 चा भारत आहे. भारतीय मेंढपाळांनी आपापल्या मूळ ठिकाणी परत जावे. हा भाग आता चीनच्या ताब्यात असून तो भारतीय मेंढपाळांना त्या ठिकाणी जाण्यास मनाई करत आहे. भारताने आता या भागावर दावा सांगून तो चीनच्या ताब्यातून परत घ्यायला हवा.' 

गलवान खोऱ्यात सोमवारी (ता. 15) रात्री हुतात्मा झालेल्या वीस जवानांना श्रद्धांजली अर्पण करत खासदार नामग्याल म्हणाले, "सीमेच्या सुरक्षेसाठी आम्हाला लडाखमधील स्थानिक लोकांची मदत हवी आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून स्थानिकांची भूमिका महत्त्वाची ठरते. गलवान खोऱ्यात भारतीय सैन्यांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्य आणि निःस्वार्थ बलिदानाला सलाम करतो. तुम्ही शेवटच्या श्‍वासापर्यंत धैर्याने लढलात, तुमचा हा पराक्रम देश कायम आठवणीत ठेवेल, अशा शब्दांत भाजपचे खासदार नामग्याल यांनी हुतात्मा झालेल्या जवानांप्रति आपल्या संवेदना व्यक्त केल्या. 

चीन सीमेवर चालेल्या घडामोडीच्या पार्श्‍वभूमीवर जमयांग सेरिंग नामग्याल यांनी गेल्या आठवड्यात सीमा भागाचा दौरा केला होता. पैंगोंग तलावाच्या परिसरातील गावांचा तीन दिवसांचा दौरा केल्यानंतर नामग्याल यांनी सांगितले होते की, चीनने सीमेलगत बाहेरून आणून लोकांना बसविले आहे. त्यामध्ये प्रवाशांचा मोठ्या संख्येने समावेश आहे. लडाखमधील डेमचोक गावासमोर चीनने आपल्या हद्दीत नवे डेमचोक गावच वसविले आहे. यापूर्वी त्या ठिकाणी गाव अस्तित्वातच नव्हते. चीनने त्या ठिकाणी 13 घरे उभारली आहेत. याशिवाय रस्ते आणि दूरसंचारची सुविधाही त्या नागरिकांना उपलब्ध करून दिली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT