Air Quality Improved in Country due to Corona Lock Down
Air Quality Improved in Country due to Corona Lock Down 
मुख्य बातम्या मोबाईल

किमया लॉकडाउनची ... सुधारली गल्लीपासून दिल्लीची हवा!

दिनकर गुल्हाने

पुसद (जि. यवतमाळ) : लॉकडाउनमुळे सर्वकाही थांबले आहे. दीड महिन्यात निसर्ग आपल्या पूर्वपदावर आला आहे. प्रदूषण आणि वाढते तापमान यामुळे बिघडलेले वातावरण आता शुद्ध झाले आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रदूषित झालेली हवा शुद्ध झाली आहे. 'सफर'च्या अहवालानुसार दोन महिन्यांपूर्वी अत्यंत खालावलेली राजधानी दिल्लीची हवा चांगलीच सुधारली आहे.

जीवनाचे चक्र ठप्प करणाऱ्या कोरोनाच्या लॉकडाउनमुळे मानवी चुका उघड झाल्या आहेत. मानवाच्या अव्यापारेषू व्यवहाराने निसर्गाच्या असंतुलनाला मोठा हातभार लागला व पर्यावरण धोक्‍यात आले. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या देशाची राजधानी दिल्ली होय... कारखाने व वाहने यांच्यातून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे दिल्ली जगातील महत्त्वाचे प्रदूषित शहर म्हणून पुढे आली आहे. 'सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी ऍण्ड वेदर फोरकास्टिंग ऍण्ड रिसर्च' अर्थात 'सफर' या संस्थेच्या अहवालानुसार फेब्रुवारी महिन्यात दिल्लीच्या हवेची गुणवत्ता 'व्हेरी पुअर' या शेऱ्याने नोंदविली गेली होती.

एअर क्वालिटी इंडेक्‍स (एक्‍युआय) तीनशे एवढा होता. अर्थातच मानवी श्वसन क्रियेसाठी धोक्‍याची घंटी टण टण वाजत होती. पण लक्षात कोण घेतोय? कोविड विषाणूच्या जगभरातील धूमाकुळाने माणसाला घरातच बंदिस्त केले आणि अखेर बदल झाला. निसर्ग मानवी हस्तक्षेपातून काही काळ मुक्त झाला. सहाजिकच निसर्गाचे शुद्ध स्वरूप प्रथमच प्रकट झाले. नुकताच आलेला 'सफर'चा अहवाल त्याची पुष्टी करतो.

लाॅकडाउनमध्ये निसर्गाची निळाई अधिक खुलली

दिल्लीतील हवेचा एक्‍युआय आता ६८ वर स्थिरावला आहे. हा आकडा हवेच्या चांगल्या गुणवत्तेचा निदर्शक आहे. अर्थात दिल्लीची हवा आता बदलली आहे. प्रत्येक जण मोकळा श्‍वास घेताना प्रफुल्लित होत आहे. दुर्दैवाने हवा शुद्ध झाली असली तरी कोरोना विषाणुमुळे माणसांचा श्वास 'मास्क'च्या आत दडला आहे. वातावरणात भिनलेल्या प्रदूषित कणांनी निसर्ग सौंदर्याला उतरती कळा लागलेली होती. दिल्लीच्या आभाळाची निळाई हरवलेली. अशातच लॉकडाउनच्या अकल्पित उपचाराने निसर्गाची ही निळाई अधिक खुलून आली आहे. 

'इंडिया गेट'चे अलीकडचे स्पष्ट छायाचित्र प्रदूषणमुक्त दिल्लीचे चित्र स्पष्ट करीत आहे. तसेच गेल्या दशकभर एप्रिल महिन्यात दिल्लीचे तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा नेहमी अधिक राहिले आहे. यंदा लॉकडाउनमुळे निसर्गाचा आविष्कार घडला. हे तापमान साधारणतः ३७ अंश सेल्सिअसच्या आसपास असल्याने दिल्लीकर घरात बसूनच स्वच्छ गार हवेची झुळूक उन्हाळ्यात अनुभवत आहेत.

वातावरणातील क्लियारिटी खूप छान

शुद्ध हवेची दिल्लीतील हीच परिस्थिती आपल्या अवतीभवतीच्या गाव-शहरातील गल्लीत असल्याने नागरिक खुश आहेत. हवेच्या प्रदूषणामुळे निर्माण होणारे श्वसनाच्या आजारांमध्ये उल्लेखनीय घट झाली आहे. दिल्लीत शुद्ध व नैसर्गिक हवा प्रथमच अनुभवत आहे. वातावरणातील क्‍लियारिटी खूप छान आहे. हे लॉकडाउनमुळे घडून आले, अशी सहज प्रतिक्रिया नामवंत आयआयटी संस्थेच्या तज्ज्ञ प्रोफेसरांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.

प्रदूषण झपाट्याने वाढण्याची शक्‍यता
वातावरण शुद्ध झाले आहे. लॉकडाउन काढल्यानंतर परत मानवी हस्तक्षेपामुळे हवेची गुणवत्ता ढासळून पुन्हा एकदा प्रदूषण झपाट्याने वाढण्याची शक्‍यता आहे - टी. के. जोशी, सदस्य, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ

पुन्हा प्रदूषण वाढणार नाही याची काळजी घ्या
दिल्ली 'आयआयटी'मध्ये एम. टेक. करताना व आता केंद्रीय आरोग्य खात्यात रूजू झाल्यानंतर पहिल्यांदाच चार वर्षांतील एवढी स्वच्छ हवा मन प्रसन्न करीत आहे. प्रदूषणाचा इशारा दिलेल्या दिल्लीतील हा बदल अकल्पनीय वाटतो. मात्र लॉकडाउनने हे शक्‍य करून दाखविले. पुन्हा प्रदूषण वाढणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे - अक्षय गुल्हाने, नवी दिल्ली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT