मुख्य बातम्या मोबाईल

महापुराचे पाणी दुष्काळी भागात वळवू : मुख्यमंत्री

सरकारनामा ब्युरो

सांगली : अतिवृष्टीच्या काळात कोयना धरणातून टनेलव्दारे पाणी दुष्काळी भागात नेण्याची प्रकल्प आपण सुरू करत आहोत. पुढील पाच-सहा वर्षांत ही योजना पूर्ण करून महापूर आणि दुष्काळ दूर करू, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा जिल्ह्यात आली. शिराळा, इस्लामपूर, पलूस-कडेगाव, तासगाव आणि मिरज मतदारसंघातून आलेल्या यात्रेचे सांगलीत जल्लोषी स्वागत झाले. भोकरे कॉलेज परिसरात आमदार सुधीर गाडगीळ यांनी या रथाचे स्वागत केले. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील, जिल्हाध्यक्ष आमदार पृथ्वीराज देशमुख, प्रदेश सरचिटणीस मकरंद देशपांडे सोबत होते. महापौर संगीता खोत, माजी आमदार दिनकर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, नीता केळकर यांनी पुष्पराज चौकात त्यांचे स्वागत केले. ढोल, ताशांच्या गजरात घोषणा देण्यात आल्या. क्रेनमधून मुख्यमंत्र्यांवर गुलाब पाकळ्यांची वृष्टी करण्यात आली. लोकांनीही झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या उधळत स्वागत केले. 

तीन हजार किलोमीटरचा प्रवास करून मी आलोय, असे सांगत श्री. फडणवीस म्हणाले, "महापुराने प्रचंड नुकसान झाले, मात्र सरकार तुमच्या पाठीशी ठाम उभे राहिले. प्रत्येकापर्यंत मदत पोचवण्याची खबरदारी घेतली, आणखी कुणी राहिले असेल तर त्यालाही मदत पोच होईल. 2005 च्या पुरातील निर्णय बघा आणि आताच्या सरकारचे निर्णय बघा. केवळ मदत करून आम्ही थांबलो नाही. या प्रश्‍नावर पायाभूत सुविधा निर्माण करून उत्तर शोधले जाईल. महापूर आला तरी वीजपुरवठा बंद होणार नाही, पाणीपुरवठा बंद होणार नाही, अशी व्यवस्था निर्माण केली जाईल. जागतिक बॅंकेचे 22 तज्ज्ञ सांगलीत येऊन गेले. एशियन बॅंकेचे तज्ज्ञ आले. त्यांच्या मदतीने रस्ते, पाणी, वीज यावर काम करत आहोत. ज्यांची घरे वारंवार पाण्यात जातात, त्यांचे पुनर्वसन केले जाईल. पुढे कधी अतिवृष्टी होईल, महापुराची भीती असेल तेव्हा धरणातून टनेलव्दारे पाणी काढून ते दुष्काळी भागाला देण्याची योजना हाती घेतली आहे. त्याला जागतिक बॅंकेने मान्यता दिली आहे.''
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT