The Maharashtra government will buy power from a Gujarat company
The Maharashtra government will buy power from a Gujarat company 
मुख्य बातम्या मोबाईल

महाराष्ट्र सरकार गुजरातच्या कंपनीकडून वीज खरेदी करणार 

सरकारनामा ब्युरो

मुंबई  : कोस्टल गुजरात पॉवर लिमिटेड या गुजरात येथील औष्णिक वीज प्रकल्पातून पूरक वीज खरेदीसाठी करार करण्यास गुरुवारी (ता. 25 जून) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. 

या प्रकल्पातून निर्माण होणारी 760 मेगावॉट वीज खरेदीसाठी 22 एप्रिल 2007 रोजी महावितरण कंपनीने दीर्घ मुदतीचा करार केला आहे. त्याचा समतल दर 2 रुपये 26 पैसे प्रती युनिट इतका आहे. कोस्टल गुजरात प्रकल्पासंदर्भात उच्चस्तरीय समितीच्या शिफारशी विचारात घेतल्या जातील.

सर्व वीज खरेदीदार राज्यांची संयुक्तपणे एक समान दराने, समान अटी व शर्तींसह पूरक वीज खरेदी करार करण्यास सहमती असल्यास केंद्रीय विद्युत नियामक आयोगाच्या मान्यतेच्या अधिन राहून पूरक वीज खरेदी करार करण्यात येणार आहे. 

उद्योगांना वीज शुल्कात सवलत 

राज्यातील उद्योगधंद्याना वीज शुल्कामध्ये सवलत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. 

सध्याचे विद्युत शुल्क 9.3 टक्के असून ते 7.5 टक्के इतके करण्यात येईल. याचा फायदा सर्व औद्योगिक घटकांना होऊन उद्योगधंद्यांना स्वस्तात वीज उपलब्ध होईल. यामुळे राज्य सरकारला दरवर्षी 440 कोटी 46 लाख इतका महसुली तोटा होईल. या संदर्भातील घोषणा नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली होती. 

नागपूर-नागभिड ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचे काम सुरु होणार 

नागपूर-नागभिड या नॅरोगेज रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज रेल्वे मार्गात रुपांतर करण्याकरिता राज्य सरकारचा सहभाग देण्याबाबत राज्य सरकारच्या आर्थिक सहभागास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. 

नागपूर-नागभीड या 116.15 किमी नॅरोगेज रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज रेल्वे मार्गात रुपांतर करण्यात येईल. सुधारित अंदाज पत्रकानुसार सदर प्रकल्प महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनीमार्फत 1400 कोटी रुपये खर्चाच्या मर्यादेत 60 टक्के कर्ज आणि 40 टक्के समभाग मूल्य या प्रमाणात राबविण्यास मान्यता देण्यात येणार आहे.

या प्रकल्पासाठी समभाग मुल्यातील राज्य सरकारचा अर्धा हिस्सा याप्रमाणे 280 कोटी एवढा निधी टप्प्या टप्प्याने देण्यास मान्यता देण्यात आली आहे. 

या प्रकल्पासाठी समभाग मूल्यातील केंद्र सरकारने अर्धा हिस्सा या प्रमाणे 280 कोटी एवढा निधी देणार आहे. या प्रकल्पासाठी घ्यावयाच्या 840 कोटी कर्ज रक्कमेपैकी 50 टक्के कर्ज रक्कमेस म्हणजे रु. 420 कोटी रक्कमेस राज्य सरकारने हमी द्यावी आणि उर्वरित 50 टक्के क्कमेस केंद्र सरकारने हमी द्यावी या अटीच्या अधिन राहून या प्रकल्पास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT