Vishwajeet Kadam criticizes BJP over its Agitations
Vishwajeet Kadam criticizes BJP over its Agitations 
मुख्य बातम्या मोबाईल

भाजपने राज्याला सोडले वाऱ्यावर; डाॅ. विश्‍वजित कदम यांची टिका

सरकारनामा ब्युरो

सांगली  : संकटातही राज्य सरकार शर्थीने राज्यातील शेतकरी-मजूरांसाठी मदतकार्य करीत आहे. कोरोना आपत्तीविरोधातील लढा एकत्रितपणे लढण्याऐवजी राज्यातील भाजप नेते पंतप्रधान निधीला मदत करीत राज्यातील जनतेला वाऱ्यावर सोडतात, अशी टिका राज्यमंत्री डाॅ. विश्‍वजित कदम यांनी येथे केली.

ते म्हणाले, "राज्य सरकारने मदतीचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी करणाऱ्या विरोधकांची टीका आश्‍चर्यकारक आहे. महापुराच्या काळात केंद्र सरकारने महाराष्ट्राला किती मदत केली, हे माहित आहे. आता तर राज्यावरच संकट ओढवले आहे. राज्याच्या हक्काचा जीएसटी परतावाही केंद्र सरकारने थकवला आहे. राज्यातील सर्वसामान्य माणूसही मुख्यमंत्री निधीला मदत देत आहे; मात्र राज्यातील भाजपचे लोकप्रतिनिधी राज्याला वाऱ्यावर सोडून केंद्राला मदत देत आहेत. केंद्राने मदत द्यावी, यासाठी चकार शब्द काढत नाहीत मात्र राज्याने मदत करावी, यासाठी आंदोलने करीत आहेत. त्याऐवजी त्यांनी केंद्राकडून राज्यात जास्तीत जास्त मदत आणण्याबाबत मोलाची भूमिका पार पाडावी,''

किरकोळ आंदोलनातून राजकारण टाळावे

ते पुढे म्हणाले, ''राज्यात कोरोनाविरुध्दच्या लढ्यात आरोग्य, पोलिस, प्रशासन, लोकप्रतिनिधी चांगले काम करत आहेत. त्यांचे मनोबल वाढेल, अशी भूमिका घ्यावी. राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू आहे. तो कुठल्या पक्षासाठी, जातीधर्मासाठी नाही. किरकोळ आंदोलनातून राजकारण टाळावे.''

महापौर-आयुक्त वाद किरकोळ

महापौर गीता सुतार आणि आयुक्त नितीन कापडणीस दोघेही कोरोनाच्या लढाईत चांगले काम करीत आहेत. काही निर्णयाबाबत वेगवेगळी भूमिका असू शकते. एखाद्या कुटुंबातील वादासारखा हा किरकोळ वाद आहे. त्याबद्दल चर्चा झाली आहे. तो संपून जाईल, असे मंत्री कदम यांनी एका प्रश्‍नावर बोलताना स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT