Mahesh Landage, Asha Shendge, Sanjog Waghere .jpg
Mahesh Landage, Asha Shendge, Sanjog Waghere .jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

शाई फेकणाऱ्या नगसेविकेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार : महेश लांडगे

उत्तम कुटे

पिंपरी : महिन्याभरात भाजपचे दोन नगरसेवक तुरुंगात, पण पक्ष एकाच्याच पाठीशी या मथळ्याखाली 'सरकारनामा'ला काल (ता.१२) बातमी प्रसिद्ध झाली. अन् भाजप लगेचच समर्थन न दिलेल्या त्या दुसऱ्या नगरसेवकाच्या पाठीशी आज (ता.१३) उभी राहिली. पक्ष त्यांच्याबरोबर असून त्याच्या मागे उभा आहे, असे भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी 'सरकारनामा'ला फोन करून सांगितले. तर, यासंदर्भात राष्ट्रवादीला विचारणा केल्यानंतर त्यांनी या नगरसेविकेचे कृत्य चुकीचे असल्याचे म्हटले आहे. (Mahesh Landage said about Asha Shendge) 

स्मार्ट सिटीच्या कामाला विरोध करून त्याविरोधात गेल्या गुरुवारी (ता.९) पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या नगरसेविका आशा शेंडगे-धायगुडे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आयुक्त दालनाबाहेर गोंधळ घातला. यावेळी आयुक्तांच्या नामफलकाला काळे फासण्यात आले. सरकारी कामात अडथळा आणला म्हणून पोलिसांनी धायगुडेंसह त्यांच्या नऊ कार्यकर्त्यांना अटक केली. सध्या ते सर्वजण येरवडा कारागृहात आहेत. ही घटना निंदनीय असल्याचे सांगत भाजपने पक्षनेते नामदेव ढाके यांनी त्याचा लगेचच त्याच दिवशी निषेध केला होता.

मात्र, गेल्या महिन्यात एक लाख १८ हजाराच्या लाचखोरीत पकडले गेलेले स्थायी समिती अध्यक्षांच्या समर्थनार्थ संपूर्ण भाजप लगेचच उभा राहिला होता. हे एक षडयंत्र असल्याचे त्यांनी सांगत स्थायी अध्यक्षांना त्यात गोवण्यात आल्याचा दावा केला होता. मात्र, त्यांच्याच नगरसेविका असलेल्या धायगुडेंच्या बाबतीत चार दिवसानंतरही भाजप असा मैदानात उतरला नव्हता. ही बाब शहरवासियांना खटकली होती. तीच भावना काल 'सरकारनामा'ने महिन्याभरात भाजपचे दोन नगरसेवक तुरुंगात, पण पक्ष एकाच्याच पाठीशी या मथळ्याच्या बातमीतून व्यक्त केली. त्यानंतर आज शहराध्यक्ष लांडगेंनी फोन करून धायगुडे यांच्याबरोबर पक्ष आहे, असे स्पष्ट केले. त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले. तसेच त्यांना या प्रकरणातून बाहेरही काढू, असेही त्यांनी सांगितले. यापूर्वीही प्रशासन विरुद्ध नगरसेवक वाद झाले. पण, ते गुन्हा दाखल होईल, या टोकापर्यंत कधी गेले नव्हते, असे सांगत लांडगे यांनी यामागे तोंडावर आलेली महापालिका निवडणूक असल्याचेच अप्रत्यक्षपणे सूचित केले. 

दरम्यान, लाच प्रकरणी पालिकेवर दोन मोर्चे काढून स्थायी समितीच नाही, तर पालिका बरखास्तीची मागणी करणारी राष्ट्रवादी धायगुडे प्रकरणावर तीन दिवस गप्पच होती. त्यांनी धायगुडेंचा निषेध केला नव्हता, याकडे कालच्या बातमीत लक्ष वेधण्यात आले होते. त्यामुळे राष्ट्रवादीचे शहर सरचिटणीस तथा मुख्य प्रवक्त्यांशी संपर्क साधला असता ही बाब शहराध्यक्षांच्या कानावर घातली असल्याचे त्यांनी सांगितले. म्हणून शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांना याबाबत विचारणा केली असता सदर प्रकरणी कायदेशीर कारवाई झाली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आयुक्तांच्या नामफलकावर शाई फेकणे हे चुकीचे असून त्याच्या चौकशीची मागणी त्यांनी केली. एवढ्या टोकाचे पाऊल त्या नगरसेविकेला का उचलावे लागले. याचीही चौकशी होऊन त्यावरही अॅक्शन झाली पाहिजे,असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT